जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । शिवसेना महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्यास तयार असून याआधी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी २४ तासात मुंबईत यावं, असं मोठं वक्तव्य शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. तसेच गुवाहाटीत बसून पत्रव्यवहार करू नका असेही ते म्हणाले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदेसह बंडखोर आमदार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत अनैसर्गिक आघाडी नको, असा आग्रह एकनाथ शिंदेंनी धरून ठेवला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे तब्बल ४५ हुन अधिक आमदार आहेत. शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरूवारी गुवाहाटीमध्ये शक्तिप्रदर्शन केलं. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदरांची बैठक झाली. या बैठकीला 15 आमदार उपस्थित होते.
त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे आमदार कैलाश पाटील आणि नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांनी सूरतमधून कशी सुटका केली, याबाबत अनुभव मांडले. त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, बाहेर असलेल्या शिवसेना आमदारांना जर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि वेगळा विचार करावा असे वाटत असेल तर तोदेखील विचार करू. मात्र, तुम्ही आधी 24 तासात मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी. मुंबईत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करावी असे आवाहन राऊत यांनी यावेळी केले.