⁠ 
बुधवार, मे 1, 2024

Eknath Shinde Updates : जळगावातील शिवसेनेचा शेवटचा आमदार देखील फुटला!

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप करणारे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सध्या सर्वाधिक चर्चेत असून त्यांच्यासोबत जवळपास ४० आमदार असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काल दिसत असलेले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आज नॉट रिचेबल झाले असून त्यांनी आपल्या समर्थकांना जय महाराष्ट्र असा मेसेज केल्याचे समजते. ना.गुलाबराव पाटलांसोबत असलेले मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील हे देखील आज नॉट रिचेबल झाले आहेत. दोन्ही नेते गुवाहाटीच्या दिशेने निघाल्याचे सांगण्यात येत आहे. (Chandrakant Patil also with Eknath Shinde)

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज असल्याचे वृत्त माध्यमातून झळकत होते. नगरविकास खात्यात आणि एकनाथ शिंदे यांच्या कामात होत असलेल्या ढवळाढवळला ते कंटाळले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील त्यांनी याबाबत बोलून दाखविले होते. पक्षप्रमुख मनावर घेत नसल्याने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषद निवडणूक आटोपताच नॉट रिचेबल झाले होते. शिंदे यांच्यासोबत असलेल्या ३० पेक्षा अधिक आमदारांचा फोटो आणि व्हिडीओ आज सकाळी व्हायरल झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील तीन आमदार त्यात असल्याचे स्पष्ट झाले होते.
हे देखील वाचा : मोठी बातमी : काल मुख्यमंत्र्यांसोबत असलेले जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आज नॉट रिचेबल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले काही मंत्री आणि आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचे वृत्त सकाळपासून समोर येत होते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे वृत्त काल प्रकाशित होत होते, परंतु जळगाव लाईव्ह न्यूजने याबाबत खात्री केली असता तसे काहीही नसल्याचे स्पष्ट झाले होते. दुपारी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील दिसून आले होते. माध्यमांना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देखील दिली होती. गुलाबराव पाटील यांची मुलुख मैदान तोफ अशी देखील ओळख आहे.

दरम्यान, आज पुन्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील नॉट रिचेबल झाल्याचे वृत्तसमोर येत असून जळगाव लाईव्हने संपर्क केला असता त्यांचा मोबाईल बंद येत आहे. गुलाबराव पाटील यांच्यासोबत काल दिसून आलेले मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील हे देखील नॉट रिचेबल येत आहे. जळगावातील सेनेची चारही आमदार फुटल्याचे निश्चित झाल्यानंतर शेवटचे आमदार देखील फुटल्याची शक्यता व्यक्त होत आहे. एका वृत्तानुसार आ.चंद्रकांत पाटील मुंबईच्या दिशेने निघाल्याचे सांगण्यात येत असून दुसरीकडे त्यांना ना.एकनाथ शिंदे यांचा फोन आल्याचे देखील म्हटले जात आहे.