जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । केंद्र सरकारने तिन्ही सैन्यात भरतीसाठी ‘अग्निपथ योजना’ (Agneepath Yojana) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तरुणांची ४ वर्षांसाठी भरती करण्यात येणार आहे. मात्र मात्र एवढ्या कमी कालावधीसाठी भरती करण्यावरून विरोधकांकडून टीका होत आहे. या योजनेवरून देशभरात आंदोलने केली जात असून अनेक ठिकाणी रेल्वे गाड्या जाळण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहे. या आंदोलनांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देशात सैन्य भरती योजनेविरुद्ध देशभरात आंदोलनं सुरु आहेत. मात्र आंदोलन करणारा तरुण हा सामान्य आहे. त्यांना विरोधकांकडून भडकवलं जात आहे. तरुणांनी थेट आंदोलनं करुण अनेक केसेस अंगावर घेताना हे लक्षात घ्यावं की अशा केसेस तुमच्या नावावर असतील तर कुठेही नोकऱ्या (jobs) मिळणार नाही. ही धमकी नाही तर वस्तुस्थिती आहे, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. योजनेच्या अनुशंगाने काही सूचना आणि त्रुटी असतील तर त्या दुरुस्त केल्या जातील. मात्र काहीही मागण्या न करता थेट आंदोलन करणं, रेल्वे जाळणं चुकीचं असल्याचं मत चंद्रकांत पाटील यांनी नोंदवलं.
नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?
अग्नीपथ योजनेवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आंदोलनं अनेक होतात. पण काहीही मागण्या पुढे न करता थेट रेल्वे जाळणं असे प्रकार झाले. याचा अर्थ सामान्य युवक हा धाडस करत नाही. यातून केसेस दाखल झाल्या तर त्याचे नोकरीचे सर्व मार्गच बंद होतात. त्यामुळे आंदोलनातला हा सामान्य तरुण नाही. त्यामुळे अग्नीपथ योजना काय आहे, हे तरुणांनी आधी समजून घ्यावं. ती मान्य नसेल तर शांततामय मार्गाने चर्चा केली पाहिजे. आंदोलनाच्या मार्गाने तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेत आहात. तुमच्यावर केसेस दाखल होतील. कुठलीही नोकरी मिळणार नाही. मी भीती दाखवत नाही. मीही चळवळीत काम केलेलं आहे.
20 जूनला राज्यात आंदोलन
दरम्यान, अग्नीपथ योजनेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं तीव्र विरोध केला आहे. कृषी कायद्यांप्रमाणे केंद्रानं ही योजना रद्द करावी, यासाठी 20 जून रोजी राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाणार आहे. देशसेवा करण्याची संधी सैनिक म्हणून तरुणांना द्यावी, मात्र त्याला ठेकेदारीचं स्वरुप देऊन युवकांचा अपमान करू नये, ठेकेदारी पद्धतीची सैन्यभरती भाजपला मागे घ्यावीच लागेल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे घेण्यात आली आहे.