जळगाव लाईव्ह न्युज । १२ जून २०२२ । राज्यसभा निवडणुकीत भाजपने (BJP)यशस्वी खेळी करत महाविकास आघाडी सरकारला जोरदार धक्का दिला. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून आले असले तरी भाजपच्या खेळीने शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाला तोंड द्यावे लागले. या पराभवानंतर आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच सर्वांच्या नजरा आता येत्या २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीकडे लागल्या आहेत. दरम्यान, आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ‘राज्यसभा (RajyaSabha) निवडणुकीत गाफील राहून पराभव झाला, मात्र विधानपरिषदेला ताकही फुंकून प्यावं लागण्याची आवश्यकता आहे, असं मत राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केलं आहे.
अंबरनाथ शहरात एका कौटुंबिक भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आले होते. त्यावेळी खडसेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यसभेच्या निकालावर भाष्य केलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही बरेच काही शिकलो. जो अतिआत्मविश्वास होता त्यामुळे काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाले. त्याकडे आता दुर्लक्ष होता कामा नये, ही शिकवण यावेळी मिळाल्याचे खडसे यांनी कबूल केले. मात्र पराभव हा पराभव असतो. तो शिवसेनेचा असला तरी तो महाविकास आघाडीचा पराभव आहे.
हा पराभव जिव्हारी लागल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. येत्या विधान परिषद निवडणुकीत यापासून धडा घेत ताकही फुंकून पिण्याची गरज असून त्यानुसार निवडणुकीची तयारी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विधानपरिषदेची तयारी करत असताना प्रत्येक गोष्ट तपासून आणि विश्वासाने करण्याची आवश्यकता आहे, असेही खडसे म्हणाले. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीचा धसका विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारांनी घेतल्याचे बोलले जाते आहे.