भुसावळकरांनो लक्ष द्या ! आज या भागातील वीजपुरवठा खंडित राहणार
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । भुसावळात तापमान पुन्हा वाढल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे. त्यात मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली शहरात खंडित वीजपुरवठ्याचा कहर वाढला आहे. सोमवारी देखील सहा तास वीजपुरवठा खंडित राहिल्यानंतर आज शहरातील अनेक भागात सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत वीजपुरवठा टप्प्याटप्याने दोन तास खंडित राहील.
महावितरण कंपनीने शहरातील विविध फीडरवर मान्सूनपूर्व मेंटेनन्सची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे चार ते पाच तास वीजपुरवठा खंडित केला जातो. या सोबतच इतर फीडरवर देखील दिवसभरातून दोन ते तीन वेळा अर्धा ते एक तासापर्यंत वीज गूल होते. यामुळे ४५ अंश तापमानात नागरिकांना विना पंखा, कुलरने घरात बसणे कठीण होते. सोमवारी सोमनाथ नगर, गुलमोहर प्रेस्टीज, निर्मल ऑईल मिल परिसर, सरस्वतीनगर, अंबरनाथ नगर, पंढरीनाथ नगर, दुर्गा कॉलनी, शिव कॉलनी, विकास कॉलनी, हुडको परिसर, सुहास नगर, तुकाराम नगर, बंब कॉलनी, आनंद नगर, सुरभी नगर, राजेश्वर नगर, रामेश्वर नगर, जामनेर रोड भागांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत खंडित होता. एकाचवेळी होणारे हे मेंटनन्सचे काम दोन दिवस दोन, तीन तासांच्या काळासाठी करावे. यामुळे अधिक वेळ वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्याची ग्राहकांची मागणी आहे.
आज या भागात वीजपुरवठा खंडित
मंगळवारी (दि. ७) दक्षिण भागात भिरूड हॉस्पिटलचा मागील भाग, गोविंद कॉलनी, माऊली नगर, तुकाराम नगरचा काही भाग, सोमनाथ नगरात सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत वीजपुरवठा टप्प्याटप्याने दोन तास खंडित राहील. यापेक्षा जास्त वीजपुरवठा खंडित राहणार नाही, अशी माहिती सहाय्यक अभियंता पंकज वाघुळदे यांनी दिली. तर उत्तर भागात कुठेही मेंटेनन्ससाठी वीजपुरवठा खंडित होणार नसल्याचे कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे म्हणाले.