जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२२ । महाराष्ट्रात यंदा मान्सून (Monsoon) लवकर येण्याचा अंदाज हवामान खात्यानं खरंतर वर्तवला होता. मात्र पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसल्यानं गेले चार दिवस मान्सून कर्नाटकातल्या कारवारपर्यंत येऊन थांबला आहे. अशातच हवामान खात्यानं मान्सूनबाबत काहीसा दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. येत्या 5 दिवसांत राज्यात अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अरबी समुद्राच्या बाजूने मान्सूननं 29 मे रोजीचं केरळात प्रवेश केला होता. त्यानंतर 31 मे रोजी मान्सून कर्नाटकच्या कारवापर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर गोव्यापासून काही अंतरावर असताना पोषक वातावरणामुळं तो केवळ दोन दिवसांत केरळमध्ये (Kerala) पोहोचेल, असं भाकीत हवामान विभागानं केलं होतं. पण अचानक हवामानात झालेल्या बदलामुळं नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला.
त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मान्सून कर्नाटकच्या कारवारमध्येच रेंगाळला आहे. पण दुसरीकडे बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्यानं लगतच्या बहुतांश भागांत मान्सूननं प्रवेश केला आहे. याच दरम्यान, येत्या 5 दिवसांत राज्यात अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात उष्णतेची लाट
दरम्यान, एकीकडे मान्सूनचा प्रवास मंदावला असला तरी तिकडे उत्तर आणि मध्य भारतात मात्र उष्णतेची लाट आली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या, उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भासह उत्तर भारतात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट असून ती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.