जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२२ । मान्सून केरळमध्ये वेळेपूर्वीच दाखल झाला आहे. यानंतर महाराष्ट्रात सध्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात राज्यात गेल्या २४ तासात अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सातारा, बीडसह नजिकच्या शहरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी म्हणजेच रविवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. यंदा वेळेआधी मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांची शेतीकामाची धांदल सुरु झाली आहे. जुनच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये राज्यात काही ठिकाणी गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये सातारा, बीड या जिल्ह्यांत मान्सून पूर्व सरी बरसल्या असल्याची माहिती हवामान विभागाने दिलीये.
दरम्यान हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात या संपूर्ण आठवड्यात मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लगतच्या काही भागांतही पुढच्या ४ दिवसांत गडगडाटासहसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं होसाळीकर यांनी ट्वीट करत म्हटलं होतं.
.. तर खान्देशात ९ जूनपासून मान्सून सरी कोसळणार
केरळातून पुढे आगेकूच करणाऱ्या मान्सूनला कोणताही अडथळा न आल्यास ९ जूनपासून खान्देशात मान्सून सरी कोसळण्याची शक्यता आहे.तर २ जूनपासून हलक्या स्वरुपात पूर्व मान्सून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे