जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२२ । राज्यातील अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाचे ढग गर्दी करताय. सोबतच सोसाट्याचा वारा वाहत असल्याने तापमान ४० ते ४१ अंशावर आले तर काही ठिकाणी तापमानाचा पारा ४४ ते ४५वर आहे. त्यामुळे काही ठिकाणी दिलासा तर काही ठिकाणी अद्यापही उष्णता कायम आहे. दरम्यान, जळगावात उष्माघातामुळे एका ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. किशोर ज्योतिराम खलपे असे 37 वर्षीय मृताचे नाव आहे.
किशोर खलपे बहिणीकडे आले होते. यावेळी त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात घडली. ते धरणगाव येथील रहिवासी होते. याप्रकरणी जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
किशोर यांच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, मृत किशोर खलपे हे मजुरीचे काम करायचे. त्यांच्या बहीण जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात राहतात. त्यामुळे मागील 15 दिवसांपासून किशोर त्यांच्या बहिणीकडे हरीविठ्ठल नगरात आले होते. गुरुवारी दिवसभर त्यांनी काम केले. यानंतर सायंकाळी सहा वाजता रिक्षा थांब्याजवळ चक्कर येऊन ते कोसळले. यानंतर नातेवाईकांनी लगेचच त्यांना वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलविले. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला अशी नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.