⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | तीन वर्षात ३३ हजारावर जळगावकरांनी काढला पासपोर्ट, तत्परतेमुळे जिल्हा पोलीसदलाला मिळाला लाखोंचा महसूल

तीन वर्षात ३३ हजारावर जळगावकरांनी काढला पासपोर्ट, तत्परतेमुळे जिल्हा पोलीसदलाला मिळाला लाखोंचा महसूल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । कधीकाळी पासपोर्ट म्हटला तर तो धनदांडग्यांची निशाणी मानला जात होता. आपल्याला विदेशात जायचंच नाही तर पासपोर्ट का काढावा? असा विचार सर्वसामान्य नागरिक करीत होते. अलीकडच्या काळात जनजागृती वाढली असून कागदोपत्री पुरावा म्हणून किंवा शिक्षण, नोकरी, फिरण्यासाठी भविष्यात विदेशात जावे लागले तर त्यादृष्टीने आतापासूनच तयारी केली जाते. जळगाव जिल्ह्यातील ३३ हजारांवर नागरिकांनी गेल्या तीन वर्षात पासपोर्ट काढले असून २०२२ च्या चारच महिन्यात ५ हजार ४८० जळगावकरांनी पासपोर्ट तयार करून घेतले आहे. जळगाव जिल्हा पासपोर्ट शाखेच्या तत्परतेमुळे जिल्हा पोलीस दलाला पासपोर्ट विभागाकडून लाखोंचा महसूल देखील प्राप्त झाला आहे.

काही वर्षांपूर्वी गुंतागुंतीची असलेली पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया आता बहुतांशी सुलभ झाली असून ऑनलाईन प्रक्रियेचा नागरिकांना फायदा होत आहे. पासपोर्ट तयार करून घेण्यासाठी नागरिकांचा कल वाढला असून जळगाव जिल्हा पासपोर्ट शाखेकडे दररोज ८० पेक्षा अधिक प्रकरणे तपासणीसाठी येत असतात. जिल्ह्याची पासपोर्ट शाखा पोलीस अधीक्षक कार्यालयात असून हवालदार दिनेश बडगुजर आणि पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र कापडणे हे त्याठिकाणी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहतात. पासपोर्ट शाखेची तत्परता लक्षात घेता आज जळगाव शाखेची झिरो पेंडन्सी असून ज्या दिवशी आलेली प्रकरणे त्याच दिवशी तपासणी करून निकाली काढली जातात.

तीन वर्षात ३३ हजारावर पासपोर्ट तयार
जळगाव जिल्ह्यातून गेल्या तीन वर्षात ३३ हजार ५२ नागरिकांनी स्वतःचे पासपोर्ट तयार करून घेतले आहेत. त्यात २०१९ मध्ये १६ हजार ६७८, कोरोना काळात २०२० मध्ये ५६६१ तर २०२१ मध्ये १० हजार ७१३ नागरिकांनी स्वतःचे पासपोर्ट तयार करून घेतले आहेत. २०२२ मध्ये जानेवारीत १४१४, फेब्रुवारीत १५००, मार्चमध्ये १४३६ तर एप्रिलमध्ये ११३० अशा एकूण ५ हजार ४८० नागरिकांनी स्वतःचे पासपोर्ट काढले आहेत. ऑनलाईन प्रक्रिया सोपी झाल्याने, पडताळणी जळगाव आणि भुसावळात होऊ लागल्याने, विदेश भ्रमंती व शिक्षणाप्रती जनजागृती वाढल्याने पासपोर्ट तयार करून घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

हे देखील वाचा : दोन वर्षात जळगाव जिल्ह्यात आल्या ५ फॉरेनच्या पाटलीन!

अशी असते पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया
पासपोर्ट काढण्यासाठी www.passportindia.gov.in या संकेतस्थळावरून आपल्याला एक अर्ज करावा लागतो. अर्ज करताना कागदपत्रे पडताळणीसाठी उपलब्ध असलेल्या तारखेपैकी एक तारीख आणि जवळचे केंद्र आपल्याला निवडावे लागते. प्रत्यक्ष पडताळणी पार पडल्यावर पासपोर्ट प्रकरण आपल्या निवासी पत्त्यालगत असलेल्या पोलीस ठाण्यात पाठविण्यात येते. स्थानिक पोलिसांनी पडताळणी केल्यावर सर्व कागदपत्रे पूर्ण असतील, गुन्हेगारी पार्श्वभूमी निरंक असल्यास प्रकरण जिल्हा पासपोर्ट शाखेत पाठविण्यात येते. पासपोर्ट शाखेने त्रुटी तपासल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब केल्यावर पासपोर्ट तयार होण्यासाठी प्रकरण देशाच्या पासपोर्ट विभागाकडे जाते. साधारणतः १५ दिवस ते महिनाभरात पासपोर्ट घरपोच पत्त्यावर येतो.

पोलीस प्रशासनाच्या जळगाव जिल्हा पासपोर्ट शाखेत सुरु असलेले कामकाज

तत्परतेने जिल्हा पोलीसदलाला मिळाला लाखोंचा निधी
पासपोर्ट तयार करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून फिरवाफिरव होते असे आपण ऐकून आहोत मात्र जळगाव पासपोर्ट शाखा त्याला अपवाद आहे. पासपोर्ट तयार करण्यासाठी पासपोर्ट विभागाकडून १५०० रुपये शासकीय फी आकारण्यात येते. पोलीस प्रशासनाकडून कागदोपत्री तपासणीचे ५० टक्के सोपस्कार पार पाडले जात असल्याने पासपोर्ट विभागाकडून पोलीस प्रशासनाला ठराविक रक्कम महसूलापोटी दिली जाते. पासपोर्ट शाखेकडे अर्ज आल्यानंतर ७ दिवसाच्या आत पुढे पाठविल्यास पोलीस प्रशासनाला १५० रुपये तर ७ ते १४ दिवसांच्या आत पुढे पाठविल्यास ५० रुपये देण्यात येतात. जळगाव जिल्हा पासपोर्ट शाखेचे काम तत्पर असल्याने शक्यतो १५० रुपयांप्रमाणे लाखो रुपयांचा महसूल पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेला आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.