जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घटमांडणीच्या माध्यमातून केली जाणारी भविष्यवाणी आज जाहीर करण्यात आलीय. या भेंडवळच्या घट मांडणीत शेती, पाऊसमान, आरोग्य आणि राजकारणाविषयी वर्षभराचं भाकित केलं जातं. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसह बियाणे कंपन्यांचंही भेंडवळच्या भाकिताकडे लक्ष लागलं होतं. अखेर या घटमांडणीचं भाकीत आज सकाळी जाहीर झालं आहे.
पावसाबद्दल काय आहे नेमका यंदाचा अंदाज?
भेंडवळ घटमांडणीनुसार, यंदा जून महिन्यात चांगला पाऊस तर जुलै महिन्यात साधारण पाऊस असेल, तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडणार आहे. तर यंदाही बळीराजाला अवकाळीचा सामना करावा लागणार आहे. भेंडवळ घटमांडणीतून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, अवकाळी पाऊस वर्षभर राहणार आहे. तर गेल्या दोन वर्ष सामना करत असलेल्या कोरोनाचा यंदा मात्र नायनाट होण्याची शक्यता आहे. कारण यंदा देशात रोगराई राहणार असा अंदाज भेंडवळच्या घटमांडणीतून वर्तवण्यात आला आहे.
काय आहे राजकीय भाकीत?
राजा कायम असणार म्हणजे देशात सत्ता पालट होणार नाही. देशाचं संरक्षण चांगलं राहील. परंतु देश आर्थिक अडचणीत असेल, असही सांगण्यात आलंय.
पिकांबद्दल अंदाज
कापूस, उडीद, ज्वारी, हरभरा ही पिके चांगली येतील. शेतमाला भावही चांगला मिळेल. तर वाटाणा, बाजरी, गहू, करडई ही पिके मध्यम स्वरूपात येतील. देशात पीक चांगले येईल. मात्र पिकांना भाव मिळणार नाही, असा अंदाज करण्यात आलाय.
काय आहे भेंडवळच्या घटमांडणी?
पर्जन्यमान, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत गेल्या ३५० वर्षांपासून चंद्रभान वाघ यांचे वंशज अक्षय तृतीयेच्या दिवशी भेंडवळ येथे घट मांडणी करतात. त्यानुसार काल ३ मे रोजी सायंकाळी या घटाची मांडणी करण्यात आली. तर आज ४ मे रोजी त्याचा भाकीत सांगण्यात आला. या भाकिताकडे महाराष्ट्रासह देशाचे सर्वांचे लक्ष लागून होते.