जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२२ । जळगाव शहरातील सर्व मालमत्ता मालकांना यंदाचे मालमत्ता कर देयक वाटप करण्यात आले आहे. चालू वर्षाचा आगाऊ भरणा ३० एप्रिलपर्यंत केल्यास करात १० टक्के सूट मिळत असते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि गेल्या दोन वर्षांची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांना सूट देण्याची मुदत मे महिना अखेरपर्यंत करावी अशी मागणी महापौर जयश्री महाजन यांनी मनपा प्रशासनाला केली होती. महापौरांच्या पाठपुराव्याला यश आले असून प्रशासनाने ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
जळगाव शहरवासियांना यंदा नवीन घरपट्टी देण्यात आली असून जुन्या घरपट्टीच्या तुलनेत त्यात मोठा फरक पडला आहे. नागरिकांची ओरड होत असून मनपाच्या सुनावणीत त्यावर हरकती नोंदवून काही मालमत्ता मालकांना घरपट्टी कमी देखील करून मिळाली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस दरवर्षी जळगावकर मालमत्ता मालकांना कर आकारणी पत्रक देण्यात येत असते. यावर्षी देखील मनपाने करपत्रक दिले असून त्यावर आकर्षक सवलत देखील दिली आहे. ३० एप्रिलपर्यंत मालमत्ता कराचा आगाऊ भरणा केल्यास नागरिकांना १० टक्के करात सूट मिळणार होती.
गेल्या दोन वर्षांचा कोरोना काळ आणि यंदाचा तीव्र उन्हाळा लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने ३१ मेपर्यंत आगाऊ मालमत्ता कर भरणा केल्यास १० टक्के सूट देण्याची मागणी महापौर जयश्री महाजन यांनी मनपा प्रशासनाला केली होती. महापौरांच्या पाठपुराव्याला यश आले असून मनपा प्रशासनाने ३१ मेपर्यंत कर भरणा केल्यास १० टक्के सूट देण्याचे परिपत्रक काढले आहे. आखाजीच्या पूर्वसंध्येला महापौर जयश्री महाजन यांच्यामुळे जळगावकर नागरिकांना काहीसा आर्थिक फायदा होणार आहे.