⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

औरंगाबादच्या सभेनंतर राज ठाकरेंच्या ट्वीटमुळे उडाली पुन्हा खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२२ । राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरून वाद पेटला असताना आता मनसेकडून एक पाऊल मागे घेत उद्या राज्यभरात होणारी महाआरती रद्द करण्यात आली आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट केल्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. कोणीही उद्या महाआरती करू नका, पुढे काय करायचं ते मी सांगतो’, अशा शब्दात राज ठाकरेंकडून मनसैनिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

राज ठाकरे यांनी काल औरंगाबादेत एक लक्ष्यवेधी घेतल्यानंतर त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. या सभेत त्यांनी पुन्हा मशीदीवरील भोंग्यांना टार्गेट केले. “आज 1 तारीख आहे, 3 तारखेला ईद आहे, त्यानंतर 4 तारखेपासून भोंगे उतरले तर ठीक नाहीतर मशीदीसमोर अजानच्या वेळी दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लागलीच पाहिजे असा इशारा दिला दिला. आजही परिस्थिती आहे. आज नाहीतर पुन्हा कधी नाही. ही लोक जर 3 तारखेपासून ऐकली नाही तर पोलिसांकडून परवानगी घेऊन जोरात काम करा. हा विषय कायम निकाली लागला पाहिजे”, असं राज ठाकरे म्हणाले होते.

दरम्यान, अक्षयतृतीयच्या सणाला राज्यभर मनसेकडून महाआरती करण्यात येत होती. मात्र उद्याच ईदही असल्याही ही महाआरती रद्द करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. राज ठाकरेंनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली असून ‘आपण पुढे नेमकं काय करायचं, हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन.’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं आहे ट्विटमध्ये

“उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षय्य तृतीया आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करु नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटरद्वारे आपल्यासमोर मांडेन”, असा संदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना ट्विटरवरुन दिला आहे.