⁠ 
रविवार, ऑक्टोबर 20, 2024
Home | विशेष | अक्षय्य तृतीया अर्थात आखाजीला खानदेशात इतके महत्व का आहे; जाणून घ्या इतिहास

अक्षय्य तृतीया अर्थात आखाजीला खानदेशात इतके महत्व का आहे; जाणून घ्या इतिहास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२२ । वैशाख शुक्ल तृतीया हा दिवस हिंदू धर्मीय अक्षय्य तृतीया म्हणून साजरी करतात. हिंदू पुराणातील मान्यातांनुसार, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात ज्या तृतीयेला चंद्र रोहिणी नक्षत्रात येतो त्या तृतीयेला ‘अक्षय्य तृतीया’ हा मंगलमय दिवस साजरा केला जातो. अक्षय्य तृत्तीयेच्या निमित्ताने केलेला जप, होम, दान आदि गोष्टी अक्षय फल देणाऱ्या होतात म्हणून या दिवशी पुण्यकर्म करावे. यंदा अक्षय्य तृतीया मंगळवार ३ मे रोजी आहे. अक्षय्य तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक असल्याने या दिवशी सोने खरेदी, मौल्यवान वस्तू खरेदी, घर खरेदी केली जाते. तसंच कोणतंही शुभकार्य करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो.

अक्षय्य तृतीया महत्व

अक्षय्य तृतियेलाच खानदेशात आखाजी म्हणून संबोधतात. जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिक जिल्ह्याचा काही भागात प्रामुख्याने अहिराणी बोली भाषा आहे. या अहिराणीत आखाजी विषयी अनेक गीतं आहेत. या गीतातून खान्देशातील संस्कृती, जनजनीवन, कुटूंब व्यवस्था, सासर-माहेर, नातेसंबंध यांचे असंख्य पदर उलगडून जातात. सासूरवाशिणीला माहेरचा अक्षय आनंद देणारी म्हणून अक्षय्य तृतिया ओळखली जाते. अक्षय्य तृतीये दिवशी लहान मोठी का होईना पण एखादी गोष्ट दान करण्याची प्रथा आहे. समाजातील गरजू गरीब माणसांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा हा या मागील उद्देश आहे. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जलदान, ज्ञानदान, पुस्तकदान, श्रमदान, रक्तदान, अर्थदान, वस्त्रदान केले जाते. या बद्दल अशी गोष्ट आहे की, शाकल नावाच्या नगरात धर्म नावाचा एक व्यापारी राहत होता. तो रोज देवाची पूजा करीत असे आणि नेहमी सत्य बोलत असे. एके दिवशी एका विद्वानाने त्याला अक्षय्य तृतीयेचे महत्त्व सांगितले. ते ऐकून घेऊन व्यापारी नदीकाठी गेला. तेथे स्नान केले आणि पितरांचे स्मरण केले. त्यानंतर घरी येऊन त्याने पाण्याने भरलेल्या मातीच्या भांड्याचे दान केले. अशा रितीने जलदानाचा उपक्रम त्याने चालूच ठेवला. वृद्धापकाळी भगवंताचे नामस्मरण करीत असतानाच त्याला मृत्यू आला. पुढच्या जन्मी त्याला राजपद मिळाले तरी त्याने दानधर्म चालूच ठेवला. त्यामुळे त्याला बरीच संपत्ती प्राप्त झाली. त्याचा खजिना कधीही रिकामा झाला नाही. म्हणून या दिवशी दानाचे महत्त्व सांगितले आहे.

गौराई ही ग्रामीण भागातील देवता. पार्वतीचे दुसरं रूप म्हणजे गौराई. या गौराईची अक्षय्य तृतीयेला खानदेशात गावागावात स्थापना होते. मुली-स्त्रीया यांच्या भावभावनांशी निगडीत असलेल्या गौराईला ग्रामीण भागात श्रध्देचा अलोट पूर येतो. चैत्र-वैशाखाच्या रणरणत्या उन्हात अंगाची लाही लाही करणारा गौर येणे हा आजार खानदेशात पूर्वीच्या काळी प्राबल्याने होता. लहान मुलांमध्येच आढळणाऱ्या या रोगाविषयी त्या काळात फारशी माहिती नव्हती. धार्मिक उपचारांवरच अधिक भर होता. या आजारापासून सुटका व्हावी म्हणून गौराईची पूजा त्या काळात प्रचलित होती. गौराईची पूजा केली म्हणजे अशा रोगांपासून मुलांचे संरक्षण होते, असा समज होता. आज वैज्ञानिक प्रगतीने अनेक वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. गौर रोगाचे उच्चाटन झाले असले तरी हा सांस्कृतिक सोहळा, उत्सव मात्र, तेव्हढ्याच उत्साहात साजरा होतो.

अक्षय्य तृतीयेचा संबंध थेट सासर-माहेरच्या ऋणानुबंधाशीही जोडला गेला आहे. सासरी गेलेल्या मुली या सणाला माहेरी येतात. माहेरच्या आपल्या माणसांत त्या आठ, दहा दिवस राहतात. सासरी केलेल्या श्रमाचा परीहार करतात व पुन्हा नवीन उमेद, जगण्याचं बळ घेवून सासरी जातात. माहेरी नेण्यासाठी भाऊ-वडील कुणी तरी ‘मुऱ्हाई’ होवून येईल म्हणून वेशीकडून येणाऱ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली ग्रामीण स्त्री आजही खेड्यापाड्यात दिसते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.