⁠ 
बुधवार, मे 1, 2024

नो बॉल वाद भोवला ! ऋषभ पंत-शार्दुल ठाकूरला मॅच फीच्या 100 टक्के दंड

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । IPL 2022 च्या 34 व्या सामन्यात मोठा गोंधळ झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्स संघाचा १५ धावांनी पराभव केला. मात्र या सामन्यानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत चर्चेत आला आहे. प्रत्यक्षात एका चेंडूला नो बॉल न दिल्याने पंतने आपल्या खेळाडूंना मैदानातून परत बोलावण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता त्याला मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल पंतला मॅच फीच्या 100% दंड ठोठावण्यात आला आहे. म्हणजेच त्याची संपूर्ण मॅच फी कापण्यात आली आहे. तर डगआउटमधून त्याला साथ देणाऱ्या शार्दुल ठाकूरलाही मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. हे दोन्ही खेळाडू डग आऊटमधून सामना थांबवण्याचा प्रयत्न करत होते.या वादाच्या वेळी अमरे हे मैदानात गेले होते. त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याला मॅच फीच्या 100 टक्के दंडही ठोठावण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

काल दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना दरम्यान, शेवटच्या 6 चेंडूत दिल्लीला विजयासाठी 36 धावांची गरज होती. रोव्हमन पॉवेल स्ट्राइकवर होता आणि ओबेड मॅकॉय ओव्हर टाकायला आला. मॅकॉयच्या पहिल्या तीन चेंडूंवर पॉवेलने सलग तीन षटकार ठोकले. पण, तिसर्‍या चेंडूवरून वाद झाला.

हा चेंडू फुल टॉस होता आणि पॉवेलने कमरेच्या वरचा चेंडू खेळत मिडविकेटवर षटकार ठोकला. त्यावेळी नॉन स्ट्रायकर एंडला उभा असलेला कुलदीप पंचांच्या या बॉलला नो-बॉल न देण्याच्या निर्णयाने संतप्त झाला आणि त्याने पंचांकडे नो-बॉल तपासण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. यानंतर पॉवेलनेही अंपायर गाठून चर्चा सुरू केली. यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या डगआऊटमधून एक माणूस बाहेर आला आणि मैदानावर पोहोचला आणि त्यानंतर हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतही नो-बॉलच्या वादात पडला आणि त्याने कुलदीप आणि पॉवेलला डगआउटमधून बाहेर येण्याचे संकेत दिले.

हा वाद बराच काळ चालला. दरम्यान, दिल्लीचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे हेही पंचांशी बोलण्यासाठी मैदानात आले. मैदानी पंचांनी नो-बॉल तपासण्यासाठी तिसऱ्या पंचाची मदत घ्यायला हवी होती, असे दिल्ली संघाचे मत होते.