जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ४ ऑक्टोंबर,२०२१ रोजी दिलेल्या आदेशानुसार शासन निर्णय, महसुल व वनविभाग दि. २६ नोव्हेंबर, २०२१ अन्वये कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. ५०,०००/- मात्र इतके सानुग्रह सहाय्य देण्याची योजना दि. ०१ डिसेंबर, २०२१ पासुन ऑनलाईन पध्दतीने कार्यान्वित करण्यात आली आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिनांक – २४ मार्च, २०२२ रोजी दिलेल्या आदेशास अनुसरुन महसुल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक –सीएलएस-२०२१/ प्र.क्र-२५/म-३, दिनांक ११ एप्रिल, २०२२ अन्वये खालील प्रमाणे आदेश दिलेला आहे.
कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. ५०,०००/- इतके सानुग्रह सहाय्य देण्याच्या योजनेसाठी अर्ज करणेची मुदत पुढीलप्रमाणे राहील.
कोव्हीड-१९ या आजारामुळे दि. २० मार्च, २०२२ पुर्वी मृत्यु झालेला असल्यास दिनांक – २४ मार्च, २०२२ पासून ६० दिवसाच्या आत म्हणजेच दि. २४ मे, २०२२ पर्यंत, कोव्हीड-१९ या आजारामुळे दि. २० मार्च, २०२२ पासुन पुढे मृत्यू झाल्यास मृत्युच्या दिनांकापासून ९० दिवसाच्या आत, या योजनेखाली अर्ज करणेसाठी वर नमुद केलेल्या मुदतीच्या नंतरचे अर्ज केवळ गाऱ्हाणे निवारणे समिती (GRC) मार्फत करता येतील.
या योजनेकरीता ज्या अर्जदारांनी सानुग्रह सहाय्यासाठी चुकीचा दावा दाखल केलेला आहे. त्यांच्याविरुध्द जिल्हा आपत्ती व्यपस्थापन प्राधिकरणामार्फत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या कलम ५२ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.