जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । चैत्र महिन्यापासून जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी बारागाड्या ओढण्यास सुरुवात होते. जुने जळगाव परिसरातील मुख्य रस्त्यावर बारागाड्या ओढण्यात येत असतात. रस्त्याची गेल्या अनेक महिन्यांपासून दुरवस्था झाली असल्याने काही नागरिकांनी याबाबत महापौर जयश्री महाजन यांची भेट घेत तक्रार केली होती. महापौरांनी बारागाड्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून महापौर जयश्री महाजन यांनी कामाची पाहणी केली आहे.
जळगाव शहरात अमृत योजना आणि भूमिगत गटारीच्या कामामुळे रस्त्यांची प्रचंड दयनीय अवस्था झाली आहे. नागरिकांना गेल्या दोन वर्षांपासून त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. नुकतेच शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामासाठी निधी प्राप्त होऊन कामाला देखील सुरुवात झाली आहे. शहरातील जुने जळगाव भागातील पांझरा पोळ, तरुण कुढापा मित्र मंडळ चौकाकडून का.ऊ.कोल्हे शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. त्याच रस्त्यावरून काही दिवसांनी बारगड्या ओढल्या जाणार आहेत.
परिसरातील नागरिकांनी आणि बारागाड्या आयोजकांनी काही दिवसांपूर्वी महापौर जयश्री महाजन यांची भेट घेत रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली होती. महापौर जयश्री महाजन यांनी शब्द देत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. महापौरांनी मक्तेदाराला सूचना देत काम सुरु करायला सांगितले असून रात्रंदिवस काम केले जात आहे. गुरुवारी महापौर जयश्री महाजन यांनी कामाची प्रत्यक्षात पाहणी केली आहे. बारागाड्या उत्सवपूर्वी काम पूर्ण करण्याचा महापौरांनी दिलेला शब्द पूर्ण केला असून नागरिकांकडून आभार मानले जात आहे.