जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२१ । कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा अखेरीस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा मे अखेर तर दहावी परीक्षा जून महिन्यात घेतली जाणार आहे.
राज्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणत आढळून येत आहे.या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. अखेर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड होईल, असा मुद्दा चर्चेदरम्यान पुढे आला. अखेर परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी एक व्हीडिओ रिलीज करून हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे बारावीची परीक्षा मे अखेर तर दहावी परीक्षा जून महिन्यात घेतली जाणार आहे.