जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९१८ मध्ये जी अर्थनीती मांडली होती, ती आजही किती उपयुक्त आहे हे वाढत्या महागाई वरून लक्षात येते, बाबासाहेबांनी महागाई वाढू नये म्हणून सुवर्णमुद्रा पद्धती स्वीकारण्याचे धोरण सांगितले होते पण भारताने ते स्वीकारले नाही म्हणून देशात महागाई वाढत आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.
अरीहंत व सोनालकर अकॅडमी जळगावतर्फे आयोजित आंबेडकरवाद व अर्थनीती या विषयावर भाषण करतांना वाघ बोलत होते
अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणात जयसिंग वाघ यांनी सांगितले की, भारतावर आज ५७० अब्ज डॉलरचे परकीय कर्ज आहे, भारतात कुपोषण व भूकबळी पाकिस्तान व बांगलादेश या देशातील संख्येपेक्षा जास्त आहे, हे सर्व चुकीच्या अर्थनीतीचे दुष्परिणाम आहेत तेंव्हा भारताने बाबासाहेब यांच्या आर्थिक धोरणाचा अंगीकार करावा, बाबासाहेब आंबेडकर यांनी खाजगीकरणला विरोध केला आहे पण भारतात सर्वच क्षेत्राचे खाजगीकरण केले जात आहे, त्यांनी महागाईला विरोध केला पण दिवसेंदिवस महागाई वाढत आहे, शेतीला त्यांनी कणा मानले पण आज शेती दुर्लक्षित केलिजाते त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत हे सर्व रोखले गेले नाही तर श्रीलंकेतील घटना आपल्याकड घडू शकतात असेही वाघ यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षस्थानी कबीर वासंती शेखर होते त्यांनी बाबासाहेब यांचे विचार घराघरात जाणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रा.शेखर सोनालकर यांनी बाबासाहेबांच्या शैक्षणिक कार्याची माहिती विषद करून प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहन केले. अमोल भालेराव यांनी निबंध स्पर्धेमागील भूमिका विषद केलीकार्यक्रमास विद्यार्थी , पालक , शिक्षक , कर्मचारी मोठया संख्येने हजर होते. याप्रसंगी निबंधस्पर्धेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांना मानचिन्ह व प्रमाणपत्र जयसिंग वाघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.