जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । महागाईच्या काळात शिक्षण, (Education) आरोग्य आणि इतर खर्च खूप वाढले आहेत. अशा परिस्थितीत लोक पालक होताच मुलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी त्यांच्याशी संबंधित आर्थिक नियोजन करायला लागतात. मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्याचा प्रवेश चांगल्या शाळा, महाविद्यालयात व्हावा अशी प्रत्येक आई-वडीलांची अपेक्षा असते. त्यामुळे मुलं लहान असल्यापासूनच त्याची तरतूद केली जात असते. मुलांचे शिक्षणाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी पालक विविध पर्यायांचा शोध घेत असतात. अशा परिस्थितीत पालक परताव्याची हमी असलेल्या गुंतवणूक पर्यायांची चाचपणी करीत असतात. त्यांचा शोध एलआयसीच्या जीवन तरुण योजनेद्वारे पूर्ण केला जाऊ शकतो.
मुलांसाठी खास योजना
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने मुलांच्या गरजा लक्षात घेऊन ही पॉलिसी तयार केली आहे. LIC जीवन तरुण ही एक नॉन-लिंक्ड, सहभागी, वैयक्तिक, जीवन विमा बचत योजना आहे. जेव्हा तुम्ही या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करता तेव्हा LIC संरक्षण आणि बचत दोन्ही सुविधा उपलब्ध करुन देते. मुलांचे शिक्षण आणि इतर गरजा लक्षात घेऊन या योजनेत गुंतवणूक करता येते.
पॉलिसी घेण्यासाठी वय किती असावे
LIC जीवन तरुण योजना घेण्यासाठी, मुलाचे वय किमान 90 दिवस असावे. त्याचबरोबर यासाठी 12 वर्षांची कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात 12 वर्षांखालील मुलं असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता.
किती परतावा मिळेल?
एलआयसी कॅल्क्युलेटरनुसार, जर एखादी व्यक्ती 90 दिवसांपासून एक वर्षांपेक्षा कमी वयाच्या आपल्या मुलासाठी दरमहा सुमारे 2,800 रुपये देत असेल तर मुलाच्या नावे 15.66 लाख रुपयांचा निधी पॉलिसीची मुदत संपेपर्यंत जमा होतात. ही पॉलिसी 25 वर्षांत परिपक्व होते. त्याच वेळी, तुम्हाला 20 वर्षांसाठी दरमहा 2,800 रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल.
दुप्पट बोनस मिळवा
मूल 25 वर्षांचे झाल्यावर या पॉलिसीअंतर्गत संपूर्ण फायदे उपलब्ध आहेत. तुम्हाला या योजनेवर मॅच्युरिटीच्या वेळी दुप्पट बोनस मिळू शकतो. तुम्ही ही पॉलिसी 75,000 च्या किमान सम इंश्योर्डवर घेऊ शकता. यासाठी कोणतीही कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही.