जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । जळगाव शहरातील आशादीप वसतीगृहात पोलिसांनी महिलांना नग्न करुन नृत्य करायला लावल्याचा प्रकार खोटा असल्याचे समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे चांगलेच आक्रमक झाले आहेत.
“आशादीप वसतीगृह प्रकरणात जळगाव जिल्ह्याची बदनामी झाली आहे. या प्रकरणी विरोधकांनी सर्व माहिती घेऊनच यावर जबाबदार विरोधी पक्षाने बोलायला हवे होते. यामुळे राज्यभर जळगावची बदनामी झाली आहे. कोणतीही माहिती न घेता विरोधकांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. हा प्रकार जबाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नाही. हा उठावडेपणा आहे,” असे एकनाथ खडसे म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 4 मार्च रोजी या प्रकरणाचा चौकशी अहवाल विधानसभेत मांडला. या अहवालानुसार असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले जात आहे.
जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. या प्रकरणात एका पोलिस अधिकाऱ्यांना याचा व्हिडिओ काढल्याचाही आरोप केला जात होता. जिल्हाधिकाऱ्यांकडे या कृत्याचा व्हिडीओही सादर केला होता. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तातडीने दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. हा प्रकार खडल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. राज्यभरातून महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकार यांच्यावर टीका करण्यात आली. याच मुद्द्यावरुन भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरलं. विधानसभेतही हा मुद्दा चांगलाच गाजला होता. मात्र, त्यानंतर जळगावमध्ये महिलांना नृत्य करायला लावण्याचा कोणताही प्रकार घडलाच नसल्याचे नंतर समोर आले.