विधानसभा अध्यक्ष निवड, आ.गिरीश महाजनांची ‘सुप्रीम’ धाव
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२२ । महाराष्ट्रातील (Maharashtra) विधानसभा अध्यक्षांच्या (Assembly Speaker Election) निवडीचा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणूक प्रक्रियेला विरोध करणारी याचिका भाजप नेते गिरीश महाजन आणि जनक व्यास यांनी दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली होती. तसेच गिरीश महाजन यांनी भरलेली 10 लाख रुपयांची अनामत रक्कम देखील जप्त करण्यात आली होती. आता गिरीश महाजन यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
गिरीश महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. गिरीश महाजन यांच्या याचिकेवर आज सुनावणी होऊ शकलेली नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील अद्याप विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी परवानगी दिलेली नाही. महाविकास आघाडी सरकारनं 9 मार्चला विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्याची तयारी केलेली होती. मात्र, राज्यपालांनी परवानगी दिलेली नाही.
दरम्यान, उच्च न्यायालायने महाजनांच्या याचिकेवर सुनावणीवेळी १२ आमदारांची नियुक्ती न केल्याबद्दल नाव न घेता राज्यपालांवर नाराजी व्यक्त केली होती. न्यायालय म्हणाले होते की, आम्ही आठ महिन्यांपूर्वी १२ विधानपरिषद नामनिर्देशित सदस्यांबाबत निर्णय दिला होता. मात्र अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे नाही का? असा सवाल मुख्य न्या. दिपांकर दत्ता यांनी याचिकाकर्ते महाजन यांना केला होता. राज्यपालांनी न्यायालयाच्या मताचा मान राखायला हवा होता, अशी खंतही न्यायालयाने बोलून दाखवली होती.