सासूने सांभाळले घर आणि सूनबाईने कार्यालय !
जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष महिलादिनानिमित्त आज पत्नी सौ. यामिनी व सूनबाई सौ. श्रृती यांच्याविषयी गौरवाने लिहायला हवे. आपल्याच कुटुंबातील महिलांविषयी आपण फारसे बोलत नाही आणि लिहिणे तर दूरच. तरीही गृपमधील इतरांनी केलेले लेखनाचे प्रयत्न पाहून मी सुद्धा दोघांप्रती कौतुकाचे दोन शब्द लिहितो.
आमचे लग्न होण्यापूर्वी यामिनी यांचे करियर विज्ञान व विधी शाखेची पदवीधर (BSC LLB) झाल्यानंतर वकील म्हणून सुरू झाले होते. त्यांचे माहेर वर्धा येथील. तेथे त्यांनी न्यायालयीन कामकाजात सहभाग सुरू केला होता. सन १९९० मध्ये आमचा विवाह झाला. तेव्हा आम्हीही बिल्डर व्यवसायात स्थिरावलेलो होतो. एकत्र कुटुंबात सूनबाईची जी प्राथमिक जबाबदारी होती ती कुटुंब जोडून ठेवण्याची. त्यामुळे आपोआप घराची सूत्रे सौ. यामिनी यांच्याकडे आली. त्यांच्या करियरला पुढे नेण्याविषयी संधी समोर नव्हती. तशी कुटुंबात गरजही नव्हती.
यामिनी यांनी ही स्थिती उत्तमपणे समजून घेतली आणि घराकडे लक्ष घातले. मी पूर्णतः व्यवसायात व्यस्त असताना घराची सर्व जबाबदारी सौ. यामिनीने सांभाळली हे मी खुलेपणाने मान्य करतो. सौ. यामिनीने तिच्या करियरसाठी पूरक असलेले कौशल्य सामाजिक संघटन व कार्यात वापरले. इनरव्हील क्लब, जेसीज अशा संघटनमध्ये अध्यक्ष व इतर पदे भुषवित नव नवे उपक्रम सुरू केले. एकदा ८ मार्चला इनरव्हील क्लब, मनपा यांच्या संयुक्तपणे सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या गायनाचा कार्यक्रम बालगंधर्वामध्ये घेतला होता. त्याला जळगावकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. मला आनंद आहे. सौ. यामिनीची घराबाहेर सामाजिक कार्यकर्ती म्हणून ओळख आहे.
सूनबाई सौ. श्रृतीचे सुद्धा करावे तेवढे कौतुक कमी आहे. पुत्र श्रेयश आणि श्रृतीचा प्रेम विवाह आहे. तीन वर्षांपूर्वी दोघे विवाह बंधनात बांधले गेले. श्रृती मूळची चंडीगडची असून तिने बायोटेक इंजिनिअरिंग केले आहे. ती दक्षिणेकडील पुण्यात बहिणीकडे आलेली असताना श्रेयश व तिची ओळख झाली. नंतर परिचयाचे रूपांतर प्रेमात आणि अंतिम निष्कर्ष लग्नात झाला. दोन्ही कुटुंबाने हा विवाह ॲरेंज मैरेज सारखा साजरा केला. श्रृतीने मात्र आमच्या कार्यालयीन कामकाजात फायनान्स, बँकींग आणि लिगल ही कामे आपसूख सांभाळणे सुरू केले. कार्यालयातील अंतर्गत कामकाजाची मोठी जबाबदारी तिच्यावर आहे. येथे एक गोष्ट नमूद करायला हवी. श्रृतीने गुजराती, हिंदी व मराठी भाषा बऱ्यापैकी आत्मसात केल्या आहेत. ती बोलतेही उत्तमपणे.
आज महिलादिनी यामिनी व श्रृतीविषयी विचार करताना लक्षात आले की, सासूबाईंनी घर आणि सूनबाईने आॉफीस उत्तमपणे सांभाळले आहे. मला व श्रेयसला या दोघांचा आदर आणि सन्मान नक्कीच आहे. दोघींसह सर्व महिला वर्गाला मनःपूर्वक शुभेच्छा !
(अनिशभाई शहा, जळगाव)
सौजन्य : Dilip Tiwari’s Diamond’s Group