---Advertisement---
विशेष जळगाव जिल्हा

महिलादिन विशेष : सौ. भारती कैलास सोनवणे

---Advertisement---

कोरोनाशी दोन हात करणारी योद्धा

womens day special bharti kailas sonawane jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । पत्नीबद्दल मी काय लिहावे, कसे लिहावे हे सुचतच नाही. तिच्याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. घर कुटुंब सांभाळत, जीवाची पर्वा न करता कोविड काळात तिने केलेले कार्य जळगावकर कायम लक्षात ठेवतील असे आहे. माझी अर्धांगिनी म्हणजे जळगाव शहराची माजी प्रथम नागरिक भारती सोनवणे. आज महिला दिनानिमित्त कोरोनाकाळात तिने केलेल्या कार्याबद्दल थोडक्यात व्यक्त होण्याचा हा लहानसा प्रयत्न..

---Advertisement---

देशात सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक काही महिन्यांपूर्वी कोरोनाने शिरकाव केला. एकीकडे जगात कोरोना डोके वर काढत असताना जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी भारती यांना संधी मिळाली. महापौर पद हाती येताच सेवा परमो धर्म: तत्वाला अनुसरून त्या कामाला लागल्या. कुटुंब, घरकामाचे उत्तम नियोजन सांभाळणाऱ्या भारती यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी मनपा प्रशासनासोबत उत्तम नियोजन केले. जनतेच्या सुरक्षिततेसाठी महापौरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवसरात्र विविध उपाययोजना राबविल्या.

जळगाव शहराच्या महापौरपदाचा कार्यभार भारती यांनी जानेवारी २०२० महिन्याच्या अखेरीस हाती घेतला. मनपाचा कार्यभार समजून घेत मागील आढावा घेण्यात फेब्रुवारी महिना उलटला. मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोना जिल्ह्याच्या वेशीपर्यंत येऊन पोहचताच महापौरांनी नियोजनाला सुरुवात केली. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव अधिक असल्याचे लक्षात घेऊन भारती यांनी मुस्लीम धर्मगुरू, मौलाना आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मनपात बैठक घेतली. नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जाताना वजू केल्यावर प्रत्येकाने वेगळा हातरुमाल वापरावा, फिजीकल डिस्टन्स ठेवावे अशा सूचना त्यांनी दिल्या. देशभर लॉकडाऊन होण्यापूर्वीच त्यांनी इतरांना जागरूक करून आपलं कर्तव्य पार पाडले.

जळगाव शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर मध्यरात्रीच मला सोबत घेत भारती या त्या रुग्णाच्या कुटुंबियांची चौकशी करण्यासाठी पोहचल्या. संपूर्ण परिसर रात्रीच स्वतः उभे राहून निर्जंतुक करून घेतला. मला आठवते कि, पहिल्या रुग्णाच्या घरी भेट देऊन येताना मनात प्रचंड भीती होती. कुटुंबियांना न भेटताच अगोदर अंघोळ करून मग योग्य ती खबरदारी घेत पुढे काम सुरु केले. जळगाव शहरात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी महापौरांनी प्रत्येक प्रभाग आणि प्रत्येक गल्ली निर्जंतुक करून घेतली. स्वतः प्रत्येक गल्लीबोळात फिरून नागरिकांशी चर्चा केली. काही ठिकाणी सामाजिक संस्थांची देखील मदत घेतली.

पत्नी, आई, एक स्त्री म्हणून तर आजवर भारती यांनी माझ्यासह संपूर्ण कुटुंबाला सांभाळून घेतले. वेळोवेळी गरज असताना आम्हाला शांतपणे समजावले, कधी संताप देखील केला पण तो आमच्या भल्यासाठीच. कोरोना काळात परिस्थिती मात्र वेगळी होती. एखाद्या परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरत होती. भारती यांनी त्या परिसरात जाऊन समुपदेशकाची भुमिका निभावली. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना स्वतःची दक्षता घेण्याचा सल्ला दिला. नागरिकांनी घाबरू नये मात्र खबरदारी घ्यावी असे आवाहन केले. परिस्थिती प्रचंड भयंकर होती. काही समजून घेण्याची रुग्णांची आणि नातेवाईकांची मनस्थिती नव्हती तरीही संयम ठेवून तिने आपले कर्तव्य बजावले. इतकंच काय तर घरात मुले आणि कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह झाले तरी भारती यांचे कार्य सुरूच होते.

जळगाव शहर मनपाकडून कोरोना बाधित असलेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. रुग्णांचे विचार सकारात्मक असावे, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी स्वतः योगशिक्षिका असलेल्या भारती यांनी कोरोना बाधित आणि विलगीकरण केलेल्या रुग्णांना योगा शिकविण्यास सुरुवात केली. दररोज योगाचे धडे दिले जात असल्याने रुग्ण लवकर बरे होण्याचा दर देखील वाढला. एरव्ही कुणीही लोकप्रतिनिधी कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात येणे टाळत असताना महापौर मात्र स्वतःच्या जिवापेक्षा जनतेला अधिक प्राधान्य देत होत्या हे सांगणे मला अभिमानास्पद वाटते.

कोरोना बाधित आणि विलगीकरण केलेल्या रुग्णांना मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर भारती यांनी स्वतः फोन करून त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या असुविधांचा आढावा घेऊन तात्काळ त्या सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. बहुतांशवेळी रुग्णांची किंवा कर्मचाऱ्यांची काही अडचण असल्यास स्वतः कोविड सेंटरला जाऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. महापौर कोरोना पॉझिटिव्ह असल्यानंतर देखील घरी राहून त्यांनी रुग्णांशी फोनद्वारे संवाद साधला.

कोविड केअर सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा योग्य प्रकारचा नसल्याच्या तक्रारी काही रुग्णांनी भारती यांच्याकडे केल्या. जेवण पुरवठादाराला वारंवार सांगून देखील सुधारणा होत नसल्याने अखेर भारती यांनीच दररोज कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन चहा, नाश्ता आणि जेवण करण्याचा निर्णय घेतला. भारतीसह मी दररोज त्याठिकाणी जेवण करू लागल्याने अन्नपदार्थांचा दर्जा तर सुधारलाच शिवाय जेवण देखील वेळेवर मिळू लागले.

आपल्या देशातील शूर योद्धा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी स्वतःच्या प्रजेसाठी आपला जीव धोक्यात घालून लढा दिला होता. प्रत्येक भारतीयांच्या मनात त्या आजही अजरामर आहेत. जळगाव शहराच्या प्रथम नागरिक असताना भारती या देखील आधुनिक काळातील झाशीच्या राणीच आहेत. कोरोना योद्धा म्हणून जळगावकर जनतेच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत कार्यरत होत्या. इतकंच काय तर रात्री अपरात्री केव्हाही, कुणीही त्यांना मदतीसाठी संपर्क केला तर त्या योग्य ती व्यवस्था करून देत होत्या. आधुनिक तंत्राचा उपयोग करून त्या कायम सर्वांच्या संपर्कात राहतात. जनसेवा हेच जीवन म्हणून कार्यरत राहणाऱ्या भारती यांच्या कार्याला आज महिलादिनानिमित्त मानाचा मुजरा..!

(कैलास नारायण सोनवणे, जळगाव)

सौजन्य : Dilip Tiwari’s Diamond’s Group

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---