जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२२ । मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील भाविकांच्या टेम्पोला परत जाताना गिगाव फाट्यावर अपघात झाल्याची घटना सायंकाळी घडली. अपघातात ६ जण ठार झाले असून १५ पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
रविवार असल्याने चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील भाविक मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. खंडेराव महाराजांचे दर्शन व गोंधळाचा कार्यक्रम आटोपून भाविक टेम्पो क्रमांक एमएच.१९.बीएम.०१०२ ने पुन्हा आपल्या गावाकडे निघाले होते. गिगाव फाट्यावर आल्यानंतर भरधाव टेम्पो पलटी झाला. अपघातात ६ जण ठार झाले असून १५ पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेऊन जखमींना टेम्पोतून बाहेर काढून तालुका पोलिसांना याची खबर दिली. तात्काळ घटनास्थळी पोलिसांसह रुग्णवाहिका दाखल होऊन जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींवर मालेगावला खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
दरम्यान, अपघात कसा झाला हे निश्चित समजले नसून टेम्पोचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो महामार्गावर उलटली अशी माहिती आहे. तसेच मागून येत असलेल्या भरधाव पीकअपने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची चर्चा आहे. टेम्पोत २० पेक्षा अधिक प्रवासी असल्याचे समजते. ते चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेडा येथील रहिवासी आहेत.