जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२२ । सैन्य दलातील जवानाने धरणगाव तालुक्यातील एका गावातील 24 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंधानंतर लग्नाचे आमिष दाखवून भुसावळात अत्याचार केल्याची घटना फेब्रुवारी 2022 महिन्यात घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. आकाश संजय काळे (धरणगाव तालुका) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपी जवानाचे नाव असून तो हल्ली जम्मू काश्मिर येथे आर्मीत तैनात आहे.
भुसावळात हॉटेलमध्ये तरुणीवर अत्याचार
धरणगाव तालुक्यातील एका गावातील 24 वर्षीय तरुणी उच्च शिक्षित आहे. 26 फेब्रुवारी 2022 रोजी तिने जळगाव शहरात एमपीएससी परीक्षेचा पेपर दिला तर एक दिवस आधी 25 रोजी संशयीत आरोपी आकाश काळे याने तरुणीला फोन करून परीक्षा झाल्यानंतर 26 रोजी भुसावळात जाणार असल्याचे सांगितले व ठरल्याप्रमाणे दोघे 26 रोजी रेल्वेने भुसावळात आले. यावेळी तरुणाने तरुणीला घड्याळ व चांदीची अंगठी भेट दिली तसेच लग्नासाठी जम्मूहून मंगळसूत्र आणल्याचे सांगत ते हॉटेल गॅलेक्सीमध्ये ठेवल्याचे सांगत रात्री दहा वाजेच्या सुमारास तरुणीला हॉटेलमध्ये आणले व विश्वास संपादन करून तीन वेळा तरुणीवर अत्याचार केला, असा आरोप पीडीतेने तक्रारीत केला आहे.
लग्न न करताच केली फसवणूक
27 रोजी दोघे एस.टी.ने जळगाव व तेथून धरणगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या गावात पोहोचले व 28 फेब्रुवारी रोजी संशयीत आरोपी तरुणाने पीडीतेला फोन करून 5 मार्च रोजी आपला विवाह होणार असल्याचे सांगत तरुणीने पुन्हा फोन करू नये म्हणून बजावले तर नियोजित विवाह रद्द झाल्यानंतरही तरुणीशी लग्न करण्यास तरुणाने नकार दिल्याने पीडीतेने धरणगाव पोलिसात फसवणूक केल्याप्रकरणी तसेच अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे कार्यक्षेत्र भुसावळ असल्याने तो भुसावळात वर्ग करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.