जळगाव शहरराजकारण

राज्यपालांच्या अभिभाषणावरून एकनाथ खडसेंनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांना फटकारले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२२ । महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभिभाषण पूर्ण न करताच सभागृह सोडले. यावरून आता भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर जे काही राजकारण करायचे होते ते केले असते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आपलं अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेल्याची घटना पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या (Maharashtra ) इतिहासात घडली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळं वाद निर्माण झाला होता. त्या वादाचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनात उमटले आहेत. सत्ताधारी आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. यावेळी विरोधकांकडून देखील घोषणाबाजी सुरु होती. याच दरम्यान राज्यपालांनी अभिभाषण थांबवलं. यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यावर एकनाथ खडसे यांनी राज्यातील राजकारण्यांच्या कान टोचले आहेत. राज्यापालांच्या अभिभाषणानंतर राजकारण करता आलं असतं. त्यांना अभिभाषण पूर्ण करुन द्यायला हवं होतं, असं खडसे म्हणाले.

ओबीसी आरक्षणासंदर्भातील निर्णय दुर्दैवी
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्य मागासवर्गीय आयोगाने सादर केलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केला आहे. मात्र, अजूनही याचा सखोलपणे अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने राज्य सरकार कमी पडले असून केंद्र सरकारने इम्पेरियल डाटा राज्य सरकारला दिला असता तर तीन महिन्यात मागासवर्गीय आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी जी कसरत करावी लागली ती करावी लागली नसती. दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने अहवाल स्वीकारला नसल्याने हा ओबीसींवर अन्याय असल्याचे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. तसेच जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button