⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

गुलाबराव, एकनाथरावांचे ‘टॉम अँड जेरी’चे भांडण!

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगावकरांना लाभलेले नेते म्हणजे नुसता बोलाचा भात अन् बोलाची कढी. गेल्या आठवडाभरापासून तर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच जुंपली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या अहमदनगर येथील कार्यक्रमात केलेल्या ‘आमच्या जिल्ह्यात एकनाथ खडसे सारखा डाकू बसलाय’ने सुरु झालेले हे शाब्दिक युद्ध आता वेगळ्याच वळणावर पोहचले आहे. दोघांच्या शाब्दिक युद्धाला इकडून-तिकडून खतपाणी घातले जात असले तरी दोन्ही आपण महाविकास आघाडीचे घटक असल्याचे विसरले आहे. आज सुरु असलेल्या टॉम अँड जेरीच्या भांडणाचे फलित काहीही निघणार नाही. उलटपक्षी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर शाईफेक करण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून निधी, योजना आणण्याचा प्रयत्न केल्यास जळगावकर कायम उपकार ठेवतील.

जळगाव जिल्हा हा आजवर भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या निवडणुकीत चित्र काहीसे पालटले आणि शिवसेना, महाविकास आघाडीचे ६ उमेदवार विधानसभा निवडणुकीत निवडून आले त्यात सेनेचेच ५ आमदार आहेत. जळगाव शहर मनपा भाजपच्या ताब्यात असताना शिवसेनेने करेक्ट कार्यक्रम करीत मनपावर भगवा फडकावला. शिवसेनेचे जळगावात बळ वाढले तर भुसावळ येथे राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वात भाजप नगरसेवकांनी प्रवेश केला. जळगाव जिल्हा बँकेत देखील भाजपला दे धक्का देत महाविकास आघाडीने सत्ता मिळवली. जिल्ह्यात महाविकास आघाडीची ताकद वाढत आहे ही बाब आघाडीसाठी फायदेशीर आहे.

गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला काय झालंय तेच कळायला मार्ग नाही. एकनाथराव खडसे आणि मुक्ताईनगर मतदार संघाचे आ.चंद्रकांत पाटील यांच्यातील जुने वैर सर्वांना परिचित आहे. दोघे अगोदर मित्रपक्षाचे, नंतर विरोधक तर आता महाविकास आघाडीचे घटक आहेत. आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून दोघांचे एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप सुरूच आहेत. मध्यंतरी तर खडसे विरुद्ध पाटील असे रणांगणच पेटले होते. संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी बिघाडी कुठे असेल तर ती केवळ जळगावातच अशी चर्चा होत आहे.

खडसे विरुद्ध पाटील हा वाद शमत नाही तोच नवीन वाद सुरु झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेची मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे क्षुल्लक कारणावरून टोलेबाजी करीत आहेत. दोन्ही महाविकास आघाडीचे नेते असून दोघांचे पक्षात मोठे स्थान आहे. एकाने आज टोला लगावला तर उद्या दुसरा लगावणार हे ठरलेले आहे. डाकू, चोर, पाटील, चारी मुंड्या चीत असे काहीसे शब्द जळगावकरांसह राज्यातील जनतेला ऐकायला मिळत आहे. दोन्ही नेते जेष्ठ असून त्यांच्या अनुभव आणि वर्चस्वाचा जळगाव जिल्ह्यासाठी फायदा करून घ्यायचा झाल्यास खूप काही विकास होऊ शकतो. एकाच घटक पक्षातील असल्याने आज न उद्या दोघांना एकत्र यायचेच आहे, त्यामुळे उगाच एकमेकांवर शिंतोडे उडवून काहीही फायदा नाही. दोघांचे टॉम अँड जेरीचे भांडण केव्हा संपणार याची आता वाट पाहावी लागणार आहे.