जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२२ । यावल तालुक्यातील किनगाव येथील २९ वर्षीय तरुणाला लग्नाच्या बहाण्याने ८५ हजार रुपयाचा चुना लावून लग्नाच्या सातव्याच दिवशी नववधू मानलेल्या भावासह पसार झाली होती. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत नववधूला यावल पोलिसांनी अटक केली होती. संशयित नववधूला येथील न्यायालयात हजर केले असता कोठडी सुनावली होती. दरम्यान, या कोठडी दरम्यान तिने धक्कादायक खुलासे केले.
फसवणूक करणाऱ्या तरुणीचे हे तिसरे लग्न असल्याचे उघड झाले. यापूर्वी तिने शिरागड व भुसावळ येथील दोघांसोबत लग्न झाले होते. विशेष म्हणजे ती मानलेला भाऊ म्हणून ज्याची ओळख द्यायची तो तिचा प्रियकर होता. दोघे मिळून विवाहेच्छुक तरूणांना लुबाडायचे. गुन्ह्यातील तरुणीने चौकशीत पोलिसांना ही माहिती दिली. मंगळवारी तिला पुन्हा चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.
नेमकं काय आहे प्रकरण?
किनगाव येथील धनंजय हिरालाल सोनार याचा विवाह यशवंत उर्फ दादू विजय पाटील (रा.सांगवी खुर्द) याची मानलेली बहिण सरिता प्रकाश कोळी (रा.अंजाळे) हिच्या सोबत ठरला. या मोबदल्यात सोनारला सव्वा लाख रूपये द्यायचे होते. ८५ हजार रूपये दिल्यानंतर धनंजय व सरिताचा विवाह झाला. लग्नाच्या सात दिवसानंतर आईच्या भेटीसाठी नेतो असे सांगून यशवंत सरिताला सोबत घेऊन पसार झाला.
याप्रकरणी यावल पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. पोलिसांनी सरिताला अटक केली. न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. या कोठडी दरम्यान तिने धक्कादायक खुलासे केले. धनंजय सोनार हा तिसरा पती होता, अशी माहिती पोलिसांना दिली. मंगळवारी पोलिस कोठडी संपल्याने तिला पुन्हा यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्यायाधीश एम.एस.बनचरे यांच्या समोर हजर केले. यावेळी तिला ११ फेब्रुवारीपर्यंत ४ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.
दरम्यान, पहिला विवाह सन २०१७-१८ मध्ये शिरागड (ता.यावल) येथे, तर दुसरा विवाह ५ मे २०२१ रोजी भुसावळ शहरात आणि तिसरा विवाह १४ डिसेंबर २०२१ रोजी आळंदी (पुणे) येथे झाला होता, अशी माहिती सरिताने पोलिसांना दिली. या पद्धतीने फसवणूक करताना ते सावज हेरायचे. विवाहेच्छुक मुलाकडून पैसे घेऊन लग्न लागताच काही दिवसांनी पैसे व दागिने घेऊन पसार व्हायचे.
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्हयातील शेतक-यांना रब्बी पिकस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
- एकनाथ शिंदेंच्या या ३ मंत्र्यांना मिळणार डच्चू; कोण आहेत वाचा…
- Jalgaon : ढगाळ वातावरणाचा रब्बीतील ‘या’ पिकांना फटका, बळीराजा चिंतेत..
- नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लि.मध्ये १२वी पास ते पदवीधरांसाठी जम्बो भरती; आताच अर्ज करा
- अखेर महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा संपला! देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ