जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२१ । शहर पोलीसात आरडाओरड व धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाला ६ महिने सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायाधीश एस.एन.माने यांनी ठोठावली.यशाजी हेमराज चव्हाण असे आरोपीचे नाव आहे.
सविस्तर असे की,पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद सुरेश जोशी हे ९ मार्च २०१५ रोजी शहर पोलीस स्टेशन येथे ड्युटीवर होते. दोन गटामध्ये वाद झाला असल्यामुळे दोन्ही गट तक्रार देण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात आले होते. त्यामुळे पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी झाली होती. ठाणे अंमलदार राजेंद्र बाविस्कर हे अझरुद्दीन शेख नामक युवकाची फिर्याद लिहून घेत असताना आपल्या भावासोबत फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेला यशाजी हेमराज चव्हाण याने ठाणे अंमलदार बाविस्कर यांना माझ्या भावाची फिर्याद आधी का घेत नाही असे म्हणत आरडाओरड व धक्काबुक्की केली. तसेच शासकीय काम करीत असताना त्यास प्रतिबंध करून अडथळा आणला. त्यामुळे चव्हाण याच्याविरुध्द पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद जोशी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता,
दरम्यान, या खटल्याची अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. माने यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एन.भगत यांच्यासह पाच साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेला पुरावा, साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी यशाजी हेमराज चव्हाण याला भादंवि कलम ३५३ मध्ये दोषी धरून सहा महिने सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड तसेच, भादंवि कलम ५०६ मध्ये दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास या प्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.सरकार पक्षाच्या वतीने ऍड.अनुराधा वाणी यांनी तर आरोपीच्या वतीने ऍड.महेश भोकरीकर यांनी काम पाहिले.पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.