जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ । चोपडा तालुक्यात पिस्तूल विक्री करणाऱ्या तरुणास पोलिसांनी ३ डिसेंबर रोजी अटक केली. दरम्यान, मध्य प्रदेशातील उमर्टी हे गाव अवैध पिस्तूल तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तेथून तो आणत असल्याचे समोर आले असून, त्याच्याकडून पिस्तूल व दोन मॅगझीन जप्त केले आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
गुरजितसिंह अकबरसिंह बरनाला (वय ३६, रा. उमर्टी, ता. वरला, जि. बडवानी, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. बरनाला हा स्वत: घरी पिस्तूल तयार करतो. या पिस्तूल विक्रीसाठी तो चोपडा तालुक्यात येत असतो. ही गोपनीय माहिती नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जे. शेखर पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकातील पोलिस निरीक्षक बापू रोहोम, रामचंद्र बोरसे, बशीर तडवी, मनोज दुसाने यांच्या पथकाने ३ डिसेंबर रोजी चोपडा तालुक्यात सापळा रचला. माहितीप्रमाणे बरनाला हा पिस्तूल विक्रीसाठी ग्राहक शोधत होता. पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल व दोन मॅगझीन असा ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. बरनालाविरुद्ध चोपडा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट चाव्या तयार करण्याचेही काम
बरनालाची चौकशी केली असता तो बनावट चाव्या तयार करण्याचे काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चोरटे, घरफोडी करणारेही त्याच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे. दरम्यान, तो घरीच पिस्तूल तयार करीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार पाेलिसांनी तपास सुरू केला आहे.