ऐन हिवाळ्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात वाढला गारठा
जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२१ । गेल्या काही दिवसांपूर्वी गायब झालेली थंडी बुधवारी झालेल्या पावसामुळे परतली आहे. जळगाव जिल्ह्यात ऐन हिवाळ्यात झालेला पावसामुळे गारठा वाढला असून कमाल तापमान १८ अंशांपर्यंत खाली आले आहे. तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेली असल्याने गारठ्यात आणखी वाढ होणार आहे.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले होते. पाऊस थांबुन महिन्यावर उलटत नाही तोच ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे गायब झालेली थंडी पुन्हा वाढू लागली आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारठा वाढला आहे. कमाल तापमान १८ अंशांपर्यंत खाली आले असून किमान तापमान १६ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, अचानक वाढलेल्या थंडीमुळे नागरिक घराबाहेर पडताना स्वेटरसारख्या उबदार कपड्यांचा वापर करताना दिसून आले. वातावरणात झालेल्या या बदलामुळे हवेतील गारठा वाढल्याने थंडी, सर्दी, खोकला व तापाचे रूग्ण वाढण्याची भितीही व्यक्त केली जात आहे
पिकांना होणार फायदा?
वाढलेल्या थंडीचा फायदा गहू, हरभरा, ज्वारी, दादर यासारख्या एका पाण्यावर येणाऱ्या पिकांना होणार आहे. मात्र सलग दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण राहिल्यास पिकांवर अळ्यांचा प्रादूर्भाव होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.