रवंजे येथे विजेच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । रवंजे बुद्रुक ( ता.एरंडोल ) येथे नळाला पाणी आल्याने वीज पंपाची वायर बोर्डात लावताना शॉक लागल्याने ४५ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना २६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एरंडोल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सविस्तर असे की, रत्नाबाई महिपत माळी (वय ४५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, तालुक्यातील रवंजे बुद्रुक येथे शुक्रवारी नळाला पाणी आल्यानंतर वीज पंप सुरु करण्यासाठी रत्नाबाई माळी यांनी वीजेच्या बोर्डात वायर लावली. मात्र, त्यांना विजेचा जबर धक्का बसल्याने त्या अंगणात पडून बेशुद्ध झाल्या. त्यांना अत्यवस्थ अवस्थेत एरंडोल ग्रामीण रुग्णालयात हलवले. या ठिकाणी डॉ. कैलास पाटील, डॉ. मुकेश चौधरी यांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान, मृत रत्नाबाई माळी व पती महिपत माळी यांची परिस्थिती गरिबीची असून ते दुसऱ्याच्या शेतात काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यांच्या पश्चात २ मुली व १ मुलगा असा परिवार आहे.
या प्रकरणी भास्कर माळी यांच्या माहितीवरून एरंडोल पोलिसांत रात्री उशीरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड काॅन्स्टेबल राजेश पाटील करत आहेत.