जळगाव जिल्हाभुसावळ
भुसावळ विकासो मतदारसंघातून आ.संजय सावकारे यांचा विजय
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भुसावळ येथील विकासो मतदारसंघातून आमदार संजय सावकारे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सावकारे यांना २२ तर शांताराम धनगर यांना ४ मते मिळाली. यामुळे संजय सावकारे यांची संचालकपदी निवड करण्यात आली. ते दुसर्यांदा जिल्हा बँकेचे संचालक बनले आहेत.
सविस्तर असे की, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भुसावळ तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघांतही खूप नाट्यमय घटना घडल्या. यात संजय सावकारे आणि संतोष चौधरी या आजी-माजी आमदारांनी अर्ज भरल्याने येथील लढत चुरशीची होण्याची शक्यता होती. यातच नगराध्यक्ष रमण भोळे यांनी देखील अर्ज भरल्याने तिरंगी लढत होण्याचे संकेत मिळाले होते. तथापि, संतोष चौधरी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. त्यांनी विभागीय आयुक्त आणि औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली तरी त्यांना परवानगी मिळाली नाही. यामुळे ते रिंगणातून बाहेर फेकले गेले. तर रमण भोळे यांनी शेवटच्या दिवशी माघार घेतल्यामुळे आमदार संजय सावकारे आणि शांताराम धनगर यांच्यात लढत निश्चीत झाली. यामध्ये आमदारांचे पारडे भारी असल्याने ते मोठ्या फरकाने विजय मिळवतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. आजच्या निकालातून यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
आज झालेल्या मतमोजणीत आमदार संजय वामन सावकारे यांना २२ तर शांताराम धनगर यांना ४ मते मिळाली. यामुळे संजय सावकारे यांची संचालकपदी निवड करण्यात आली. ते दुसर्यांदा जिल्हा बँकेचे संचालक बनले आहेत.