मधमाशांच्या हल्ल्यात यावल तालुक्यातील गुराखी जखमी
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । यावल तालुक्यातील शिरसाड शिवारात गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवार दि.१२ रोजी दुपारी घडली. मधमाशांनी गुराख्यांच्या डोके, हात आणि पाठीवर चावा घेतल्याने त्यांना उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रमेश नामदेव धनगर (वय-४६) व निलेश प्रल्हाद धनगर (वय-४२) (दोघेही रा. शिरसाड, ता. यावल) हे दोन्ही शुक्रवार दि.१२ रोजी गुरे चारण्यासाठी वामन बडगुजर यांच्या शिरसाड शिवारातील शेताकडे गेले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास या भागातील मधमाशांचे पोळ उठले. या मधमाशांनी निलेश व रमेश धनगर यांच्यावर हल्ला चढवत डोके, हात आणि पाठीवर चावा घेतला.
अचानक झालेल्या या हल्ल्याने जखमी झालेले दोघे गुराखी सैरावैरा पळत सुटले व गावाकडे आले. गावात आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना तातडीने साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करून यावल ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले. येथे त्यांच्यावर डॉ. निखिल तायडे, अधिपरिचारिका माधुरी महाजन, नेपाली भोळे आदींनी उपचार केले. दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे.