जळगाव लाईव्ह न्यूज | २४ ऑक्टोबर २०२१ | यावल तालुक्यातील किनगाव येथे एका सेतु सुविधा केंद्र चालकाने थेट यावल तहसिलदारांचे पीएम किसानचे खाते हॅक करून त्यात तब्बल ३८ जणांची नोंदणी केल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या काही दिवसांपासुन तहसिल कार्यालयात पीएम किसान संर्दभातील नोंदी थांबवण्यात आल्या होत्या, तरी देखील ३८ नोंदी झाल्याने जिल्हाधिकारी यांनी याबाबत संशय व्यक्त केला, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तहसील कार्यालयाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचे काम दि. १४ ते ३० सप्टेंबर या कलावधीत तहसिलदार महेश पवार यांच्या सुचनेवरून बंद ठेवण्यात आले होते. त्यानुसार नोंदणी बंद असतांना देखील पीएम किसानच्या संकेतस्थळावर ३८ शेतकऱ्यांची नोंदणी झाल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या निदर्शनास आले. दरम्यान जिल्हाधिकारी राऊत यांनी याबाबत थेट तहसिलदार महेश पवार यांना विचारणा केली.
शेतकऱ्यांचे नोंदविले जबाब
पैसे घेऊन पी.एम. किसानच्या नोंदी केल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या म्हणुन काम बंद ठेवण्याच्या सुचना तहसिलदार पवार यांनी केल्या होत्या. मात्र त्यानंतरही ३८ नोंदी झाल्याचे समोर आल्यानंतर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना बोलावुन त्यांचे जवाब घेण्यात आले. त्यावेळी नोंदणी करीता किनगाव सेतु केंद्रात प्रत्येकी एक हजार रूपये घेतले जात असल्याचे त्या शेतकऱ्यांनी सांगितले.
विविध कालमान्वये गुन्हा दाखल
तहसिलदारांच्या लॉगीन आय-डीवर परवानगी शिवाय संकेतस्थळ हॅक करून ललित नारायण वाघ (रा.किनगाव ता.यावल) याला कोणतेही अधिकार नसतांना ३८ शेतकऱ्यांच्या नोंदी टाकल्याचे समोर आले. दरम्यान, याप्रकरणी लिपीक दिपक बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून आयटी अँक्टसह विविध कलमान्वये ललीत वाघ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील, उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार करीत आहे.