जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२१ । पत्नीच्या उपचारासाठी बँकेकडून पेन्शनवर घेतलेल्या कर्जाची रक्कम दुचाकीच्या डिक्कीतून अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची घटना सोमवार दि.१८ रोजी अमळनेर येथे घडली. दरम्यान, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांकडून या चोरट्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातील रहिवासी अशोक मंगल संदानशिव यांनी पत्नीच्या उपचारासाठी दोन लाख रुपये कर्ज काढले होते. हि कर्जाची रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यानंतर ती रक्कम काढण्यासाठी ते सोमवार दि.१८ रोजी दुपारी बँक ऑफ बडोदा शाखेत गेले होते. बँकेतून एक लाख ७५ हजार रुपये काढल्यानंतर त्यांनी एकूण रक्कमेत पाच हजार रुपये वेगळे काढून पँटच्या खिशात ठेवले व उर्वरित रक्कम पांढऱ्या पिशवीत ठेवून, ती पिशवी दुचाकी (क्र. एम.एच.१९, बी.ई.३६२७)च्या डिक्कीत ठेवली होती. दरम्यान, अशोक संदानशिव हे सुभाष चौकातील महावीर इम्पोरियमसमोर चहा पिण्यासाठी थांबले. चहा घेतल्यानंतर ते दुचाकीजवळ आले असता त्यांना डिकीची चैन उघडी दिसली. त्यांनी डिक्कीची तपासणी केली तेव्हा त्यांना त्यातील रोकड व बँकेचे पासबूक गायब असल्याचे आढळून आले.
पेन्शनवर काढले होते कर्ज
सांदनशीव हे पालिकेत नोकरीस होते, त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. पालिकेकडून मिळणाऱ्या पेन्शनवर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता. पत्नी आजारी असल्याने त्यांच्या उपचारासाठी त्यांनी बँकेकडून पेन्शवर २ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.त्यापैकी १ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम त्यांनी बँकेतून काढली होती.
चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
याप्रकरणी अशोक संदानशिव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी करीत आहेत. दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यात रोकड लांबवणारे तीन चोरटे दुचाकीवर पसार होताना दिसून आले आहेत.