जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने दिवाळीच्या तोंडावर निर्बंध आणखी शिथिल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज टास्कफोर्ससोबत बैठक होतेय. यात सर्व प्रकारची दुकाने, उपाहारगृहे, मॉलच्या वेळमर्यादेत वाढ करण्यात येणार असून, याबाबतचा आदेश एक-दोन दिवसांत प्रसृत करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सध्यस्थितीत व्यापारी दुकानं, बार, रेस्टॉरंट, मॉल्स यांना रात्री 10 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी आहे. हॉटेल्समध्येही 50 टक्के ग्राहकांनाच मुभा आहे. दसरा आता पार पडलाय आणि दिवाळी तोंडावर आहे. त्यामुळे सण उत्सवात लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यातच मुंबईत काल एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ह्या सर्व पार्श्वभूमीवर दुकानं, बार, रेस्टॉरंट, मॉल्सच्या वेळेची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा निर्णयही एक दोन दिवसातच सरकारी जारी करेल अशीही सूत्रांची माहिती आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे गेल्या काही दिवसात शाळा, महाविद्यालये, सिनेमा हॉल्स, नाट्यगृह खुली करण्यात आलीत. बंद सभागृहातील 200 लोकांच्याच उपस्थितीची मर्यादाही हटवण्यात आलीय. त्याच पार्श्वभूमीवर लोकल प्रवासाचीही परवानगी द्या अशी मागणी होतेय आणि त्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जातेय. फक्त लोकलच नाही तर हॉटेल्स, मॉलमध्येही एक लस घेतलेल्यांना प्रवेश मिळण्याची चिन्हं आहेत. ह्या संदर्भातच आज मुख्यमंत्री टास्कफोर्सच्या तज्ञांची मतं जाणून घेतील आणि त्यानंतर निर्णय होईल.