जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । शहर मनपातील ९ बंडखोर पुन्हा भाजपात परत गेले असून त्यांना धमकविण्यात येत असल्याचा प्रकार घडला होता. त्या नगरसेवकांनी याबाबत माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली असून त्यांनी बैठकीत याचा समाचार घेतला आहे. दरम्यान, आ.महाजन हे जिल्ह्याचे नेते असून त्यांच्याबद्दल कुणालाही दुमत नाही. मात्र त्यांच्या नावाखाली चुकीची माहिती पसरवली जात आहे. ज्यांचे कान टोचले असतील शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी आहे अशी प्रतिक्रिया मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी दिली आहे.
जळगाव शहर मनपातील राजकारण काही महिने शांत राहिल्यानंतर पुन्हा चांगलेच तापले आहे. भाजपातील नगरसेवकांची घरवापसी झाल्यावर दोन्ही गटात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. पुन्हा घरवापसी करणाऱ्या ९ नगरसेवकांना धमक्या देण्यात आल्याची तक्रार त्यांनी माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. नगरसेवकांच्या तक्रारीची दखल घेत आ.महाजन यांनी तुम्ही घाबरू नका मी सर्व पाहून घेईल असे सर्वांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
दरम्यान, शिवसेना नेहमी स्पष्ट असते. आम्ही कुणालाही धमकावत नाही, जे आले ते त्यांच्या इच्छेने आणि जे गेले ते त्यांच्याच इच्छेने, त्यामुळे कुणी जर कुणाचे कान टोचत असेल तर आम्ही त्याच्या पाठीशी आहोत अशी प्रतिक्रिया सुनील महाजन यांनी दिली आहे. तसेच गिरीश महाजन हे जिल्ह्याचे जेष्ठ नेते आहेत. ते कुणाबद्दल असे काही बोलतील असे वाटत नाही. त्यांना माहिती आहे जे व्हायचे ते होऊन गेले आहे त्यामुळे ते तिकडे गेले त्यांच्यासाठी वेळ खर्च करणार नाही. काही लोक त्यांच्या नावाखाली बाहेर चुकीचे वक्तव्य पसरवत आहे. गिरीश महाजन हे सर्वांचे नेते असल्याने त्यांच्याविषयी कुणालाही दुमत नाही, असेही विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी सांगितले.