जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या वाणी गल्लीत एका ३२ वर्षीय विवाहितेला पतीकडून क्रूर वागणूक देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधिक्षकांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचल्यानंतर त्यांनी तातडीने दखल घेत संबंधित महिलेची फिर्याद दाखल करून गजेत पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या वाणी गल्लीतील रहिवासी रुपाली घनश्याम कोतवाल (वय-३२) यांना पतीकडून बेदम मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही सजग नागरिकांनी व्हिडीओ आणि फोटो पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे आणि अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यापर्यंत पोहचविले होते.
रामानंद नगर पोलिसात रुपाली कोतवाल यांच्या फिर्यादीवरून पती घनश्याम प्रभाकर कोतवाल, सासू लताबाई बडगुजर, दिर ललित बडगुजर, मीनाक्षी बडगुजर, योगराज बडगुजर रा.इंद्रप्रस्थ नगर, जळगाव व नणंद उज्वला बडगुजर रा.कल्याण, भारती बडगुजर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ ऑक्टोबर २०१० पासून आजपावेतो कौटुंबिक कारणावरून शारीरिक व मानसिक छळ करून क्रूर वागणूक दिल्याचा गुन्हा दाखल आहे. तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण करीत आहेत.