जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकावर चौफेर टीका केली. अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते मराठा नको, अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते ओबीसी नको, असा हल्ला गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर चढवला. ते नाशिकमध्ये आले असता बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारने ओबीसी समाजावर खूप मोठा अन्याय केला आहे. तांत्रिक बाबी पूर्ण केल्या नाहीत. त्याचा फटका या समाजाला बसला. सरकार तुमचे असताना ही वेळ का. अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते मराठाला नको आणि अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते ओबीसीला नको. त्यामुळेच ओबीसी अभियान हाती घेतल्याचा दावा त्यांनी केला. शेतकरी प्रश्नांवरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, पवार साहेब ज्येष्ठ नेते असून राज्यातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे. अजून सरकारने कोणालाच मदत केली नाही. साधी एक दमडी फेकली नाही. त्यामुळे शेतकरी संपुष्टात येत असल्याचे ते म्हणाले.
उत्तर प्रदेशच्या घटनेमुळे महाराष्ट्र बंद म्हणायचे. हा राजकीय हेतूने घेतलेला निर्णय आहे. आधीच कोरोनामुळे व्यापारी त्रस्त आहेत. अशावेळी महाराष्ट्र बंदच्या राजकीय हाकेला कोणी साथ देणार नाही. शरद पवार उत्तर प्रदेशच्या घटनेबद्दल बोलले आणि धाडी सुरू झाल्या, असे काहीही नाही. ते स्वतः म्हणाले आहेत की, पाहुणे जाऊ द्या म्हणून. त्यामुळे अजित पवारांच्या धाडीसंदर्भात जे काही असेल, ते समोर येईलच. ड्रग्सच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसने एवढा पुढाकार घेतला आहे. आजची तरुण पिढी जागृत होत आहे. त्यातही राजकारण आणणे चुकीचे आहे. शेतकरी किंवा इतर कुठलाही मुद्दा असो त्यात राजकारण आणायचे हे या सरकारने ठरवलेले दिसते, असा आरोपही त्यांनी केला.