जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । जिल्ह्यात अवैध गौण खनिज चोरी नित्याचाच प्रकार आहे. जळगाव जिल्ह्यात एप्रिल ते जुलै या कालावधीत अवैध उत्खनन करून गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या ३२४ वाहनांना प्रशासनाकडून ३ कोटी ३७ लाख ११ हजार रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. त्यापैकी जवळपास पावणेदोन कोटींवर दंड वसूल करण्यात आला असून, १ कोटी ३५ दंड लाखांवर वाहनमालकांकडे थकबाकी आहे.
खासदारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दिशा समितीला प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार चार महिन्यांमध्ये अवैध उत्खनन व वाहतूक करणारी ३२४ वाहने पकडण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक ८४ वाहने चाळीसगाव तर प्रत्येकी ३८ वाहने जळगाव, अमळनेर तालुक्यात पकडण्यात आलेली आहे. प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या ३२४ वाहनांच्या मालकांना ३ कोटी ३७ लाख ११ हजार दंड आकारण्यात आलेला आहे. त्यापैकी १ कोटी ८३ लाख ५४ हजार ५४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दंड व बंधपत्र घेऊन जिल्ह्यात १८४ वाहने सोडण्यात आली. चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक ६६, जळगाव तालुक्यात २५ वाहने सोडली.
अधिकाऱ्यांवर हल्ल्याचे ११ गुन्हे दाखल
वाळू उत्खननासंदर्भात पारोळा, यावल, अमळनेर, पाचोरा व चाळीसगाव येथे प्रत्येकी २ तर बोदवडला एक असे ११ गुन्हे दाखल आहेत. पारोळा तालुक्यात शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याने चार आरोपींना अटक केली होती. जळगाव तालुक्यात वाळूतस्करांचा सर्वाधिक उपद्रव असल्याचे कारवाईवरून निदर्शनास येते. तालुक्यात वाळूसह इतर गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या ३८ वाहनांना ४८ लाख ८४ हजारांचा दंड केला आहे. त्यापैकी २७ लाख ९७ हजार रुपये दंड वसूल केला. चाळीसगाव तालुक्यात ८४ वाहनांना ३० लाख ८ हजार ५६० रुपयांचा दंड आकारण्यात आला. २७ लाख ८८ हजार ७९९ रुपये वसूल केले आहेत.