जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शल्यचिकित्सा शास्त्र विभागातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश जाधव यांनी राजकोट येथील पीएम केअर्स व मेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत ज्योती सीएनसी संशोधन व विकास प्रयोगशाळा येथे कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) व अन्य कॉपीराईट उपकरणांचे संशोधन नामवंत शास्त्रज्ञांसमोर सादर केले. त्यांच्या या संशोधनामुळे जळगाव व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव देशभरात पोहोचले आहे. शास्त्रज्ञांनीही त्यांच्या संशोधनाचे कौतुक केले असून त्यांच्या या संशोधनामुळे देशभरातील रुग्णालयात अत्याधुनिक उपचार भारतीय बनावटीच्या उपकरणांद्वारे आणि सेन्सर्सद्वारा करता येणार आहे.
रुग्णांवर उपचार करताना अनेकदा अत्याधुनिक सुविधा नसल्याने रुग्णाला मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. गोरगरीब रुग्णांचे तर चांगलेच हाल होत असतात. दरम्यान, आता देशभरातील रुग्णालयात अत्याधुनिक उपचार भारतीय बनावटीच्या उपकरणांद्वारे आणि सेन्सर्सद्वारा करता येणार आहे. आपत्कालीन, गुंतागुंतीचे उपचार, इन्फेक्शनचे रुग्ण यांना या संशोधनाचा फायदा होणार आहे.
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शल्यचिकित्सा शास्त्र विभागातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश जाधव यांनी याबाबत गौरवास्पद संशोधन केले आहे. त्यांनी गुजरात राज्यातील राजकोट येथील प्रसिद्ध प्रयोगशाळेत नामवंत शास्त्रज्ञांसमोर त्यांचे ४ संशोधन सादर केले. डॉ. उमेश जाधव यांनी वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) व अन्य कॉपीराईट संशोधनासाठी राजकोट येथे जाण्याची संधी मिळाली. राजकोट येथील पीएम केअर्स व मेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत ज्योती सीएनसी संशोधन व विकास प्रयोगशाळा येथे काम करण्यासाठी परवानगी व सामुग्रीची मान्यता मिळवली. तेथे नामवंत शास्त्रज्ञांसमोर डॉ. उमेश जाधव यांनी संशोधन सादर केले.
भारतीय बनावटीच्या उपकरणांद्वारे होतील उपचार
शास्त्रज्ञांनी त्यांच्या सर्व संशोधनाचे कौतुक करीत संशोधनात सातत्य ठेवा, प्रगती करा असे सांगितले. या संशोधनानुसार, रुग्णांवर देखरेख ठेवणे व उपचारांमध्ये रुग्ण बरा होण्यासाठी हस्तक्षेप करता येणार आहे. रुग्णालयात अत्याधुनिक उपचार भारतीय बनावटीच्या उपकरणांद्वारे आणि सेन्सर्सद्वारा करता येणार आहे. डॉ. उमेश जाधव यांना प्रकल्पासाठी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. मारोती पोटे, डॉ. संगीता गावित यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
डॉ. उमेश जाधव यांच्या या संशोधन प्रकल्पामुळे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे नाव उंचावले असून त्यांच्या यशाबद्दल नूतन अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील, शल्यचिकित्सा विभागातील डॉ. प्रशांत देवरे, डॉ. समीर चौधरी, डॉ.मिलिंद चौधरी, डॉ. रोहन पाटील, डॉ. स्नेहा वाडे, डॉ. विपीन खडसे, डॉ. प्रज्ञा सोनवणे, डॉ. सिकंदर खान, डॉ. पदमनाभ देशपांडे यांच्यासह सर्व डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.