जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ । अमळनेर येथील बंगाली फाईल भागातील २१ वर्षीय तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. भाग्यश्री शांताराम कोळी असे या मृत तरुणीचे नाव आहे. दरम्यान, तरूणीने सुसाईड नोट लिहून ठेवली होती, त्यात आई-वडीलांना सुखी ठेवा, असा उल्लेख केला आहे.
रेल्वे स्टेशन समोरील बंगाली फाईल भागातील भाग्यश्री कोळी या युवतीने, घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. तिचे आई-वडील जळगाव येथे राहतात. काही दिवसांपुर्वी ती अमळनेरला आजीकडे आली होती. आजी घराबाहेर बसलेली असताना भाग्यश्रीने घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. तिचे आई-वडील हातमजुरी करतात. या घटनेमागील कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, घटनास्थळी सुसाईड नोट आढळली आहे. त्यात आई-वडिलांना सुखी ठेवा आणि मला माफ करा असे नमूद केले आहे. अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.