बेसमेन्टचा व्यावसायिक वापर रोखा व बांधकाम परवानगी प्रकरणांचा निपटारा करा
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । बांधकाम मंजुरीच्या प्रकरणाची क्रमवार यादी बनवण्याचे निर्देश महापौर जयश्री महाजन तथा उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिले आहेत. बेसमेन्टच्या जागांचा पार्कींग ऐवजी अन्य वापर करणायांवर कारवाईस विलंब होत असल्याबाबतही विचारणा करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील अधिकायांची आढावा बैठक आज महापौर दालनात घेण्यात आली. या बैठकीला महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, यांच्यासह नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक अशोक करवंदे, नगररचना विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
बेसमेन्टचा गैरवापर करणायांना नोटीसेस देण्यात आलेल्या असुन, त्यावर सुनावणी घ्यावी लागणार आहे. सुनावणीची कार्यवाही त्वरीत पुर्ण करण्याचे निर्देश सभेत देण्यात आले. शहरातील अनाधिकृत बांधकामे पार्कींगच्या जागेतील वाढीव काम यांबाबत सर्व्हेक्षण केले जाण्याची आवश्यकता सभेत व्यक्त करण्यात आली.
बांधकाम प्रकरणाच्या फाईली मंजुरीस विलंब लागत असल्याकडे उपमहापौर यांनी लक्ष वेधले. सर्व बांधकाम परवानगी प्रकरणांची क्रमवार यादी बनविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुमारे साडे तीनशे कोटी रुपयांचे भुखंड हे आरक्षणाखाली आहेत. या जागांच्या अधिग्रहण महानगरपालिका आर्थिक कारणाने करु शकत नाही आणि त्या जागांच्या पर्यायी विकासालाही मंजुरी मिळत नाही याबाबत मार्ग शोधणे आवश्यक असल्याने उपमहापौर कुलभूषण पाटील यावेळी म्हणाले.
सर्व आरक्षित भुखंडांसाठी व रस्त्याअंतर्गत क्षेत्रासाठी टी.डी.आर. देऊ करण्याची पत्रे मालकांना देण्याबाबत सुचित करण्यात आले आहे.
शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे झालेली व करण्यात येत आहेत मार्जिनल जागेतही अतिरिक्त बांधकामे केली आज आहेत. नगररचना विभागाने परवानगी देतांना या बाबींची खातरजमा करुन घेणे आवश्यक असल्याच्या सुचना मा. महापौर यांनी केल्या कमी रुंदीचा रस्ता इत्यादी कारणाने आरक्षित जागेवर मुळ बाबींस मंजुरी देता येत नसल्यास अशा ठिकाणी अटी शिथील करणे अथवा आरक्षणात फेरफार करणेस अनुमती दिली पाहीजे नगररचना विभागाने याबाबतीत विकास नियावलित दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या.
विधी समिती सभापती दिलीप पोकळे, सदस्य नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, चेतन सनकत यांच्यासह नगररचना विभागाचे अधिकारी शकील शेख, प्रसाद पुराणिक, जयंत शिरसाठ, समीर बोरोले या बैठकीस उपस्थित होते.