बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचा मुक्काम आणखी वाढला आहे. मुंबईसह राज्यभरात ९ सप्टेंबरपर्यंत गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासूनच पावसाने राज्यभर चांगली हजेरी लावली आहे. पुढील 4-5 दिवस हा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ७ आणि ८ सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आहे. ६ सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
७ सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि अकोला या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
मुंबई शहर आणि उपनगरातही पावसाच्या सरी कायम आहेत. सोमवारीही कमी अधिक फरकाने मुंबईत हीच परिस्थिती राहील, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.