राखीचा आनंद काही क्षणच टिकला.. दुचाकी घसरून भावाचा जागीच मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२१ । काही तासांपूर्वी बहिणीकडून राखी बांधून घरी परतत असलेल्या खडका येथील रहिवासी ५५ वर्षीय भावाचा मुक्तळ ते सुरवाडा दरम्यान झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. जालमसिंग नयनसिंग चौधरी (वय ५५) असे त्यांचे नाव आहे.
भुसावळ तालुक्यातील खडका येथील रहिवासी असलेले जालमसिंग नयनसिंग चौधरी हे रक्षाबंधनासाठी रविवारी सकाळी पत्नी कल्पना यांच्यासह मलकापूर येथील सासरवाडीला गेले होते. तेथे सासरे उमरावसिंग दशरथ पाटील यांच्याकडे पत्नीला सोडून ते मलकापूर जवळील घिर्णी बेलाड या गावी राहणाऱ्या त्यांच्या बहिण मिराबाई फुलसिंग राजपूत यांच्याकडे गेले. तेथे मीराबाई यांनी भाऊ जालमसिंग यांना राखी बांधून गोडधोड पाहुणचार केला.
त्यानंतर ते दुचाकीने क्रमांक एमएच.१९-एआर.७१६६ ने दुपारी २ वाजता बोदवड येथे आले. दरम्यान, त्यांचे शेत सुरवाडे येथे असल्याने शेलवड-सुरवाडे मार्गे शेत पाहून खडका येथे जाऊ या उद्देशाने ते निघाले. मात्र, दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुक्तळ ते सुरवाडे दरम्यान रस्त्यात त्यांची दुचाकी घसरून रस्त्याच्या कडेला पडली. त्यात चेहऱ्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आहे.
रक्षाबंधनच्या पवित्रदिनी बहिणीची भेट घेऊन परतत असलेल्या भावाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.