जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२१ । अडीच वर्ष सत्ता असताना देखील भारतीय जनता पक्षाला आलेल्या निधीचे साधे नियोजन करता आले नाही. त्यामुळे भगत बालाणी यांनी शिवसेनेवर आरोप करण्याआधी स्वतः आत्मचिंतन करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नितीन लढ्ढा यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना दिली.
भाजपने शंभर कोटी रुपयाचा निधी जळगाव महानगरपालिकेसाठी आणला होता मात्र शिवसेनेने हा ठराव रद्द केला त्यामुळे शहराचा विकास झाला नाही असा आरोप भाजपाचे गटनेते भगत बालाणी व उपगट नेते राजेंद्र पाटील यांनी केला होता. यावर बोलताना नितीन लढ्ढा म्हणाले की, ज्या वेळेस महानगरपालिकेसाठी निधी आला होता त्यावेळेस हा निधी महापालिका स्वायत्त संस्था असतानादेखील शंभर कोटीची ही काम इतर खाजगी लोकांना देण्यात आली या मागचे कारण काय होते? व जळगाव शहराला ज्या कामांची प्राथमिक गरज नाही अशी कामं त्या निधीतून करण्यात आली होती. म्हणून आम्ही ती निविदा रद्द करत जळगाव शहराला ज्या कामाची गरज आहे त्याच कामाला प्राधान्य देत नवीन निविदा महासभेत सादर केली ज्यामुळे जळगाव शहरातच विकास होणार आहे. पुढे ते असेही म्हणाले की, या सर्व निधीचे नियोजन पूर्ण झाले असतानाही नगरसेविका ऍड.शुचिता हाडा या कोर्टात गेल्या व त्यांनी जळगाव शहराचा विकास रखडवण्याचा प्रयत्न केला व आता भगत बालाणी देखील तेच करत आहे असे लढ्ढा यांनी सांगितले.