जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । शहरातील आदर्शनगरात राहणारे भंडारी कुटुंबीय कानबाईच्या उत्सवासाठी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घर फोडून रोकड व दागिने असा एकूण १ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदर्श नगरातील हर्षल शिरीष भंडारी (वय ३७) यांचा संगणकाचा व्यवसाय आहे. कानबाईचा उत्सव असल्याने ते १४ ऑगस्ट रोजी घराला कुलूप लावून अमळनेर येथे घरी गेले होते. सोमवारी सकाळी ८ वाजता घरासमोर राहणारे राजेंद्र पाटील यांना भंडारी यांच्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच कळविले. त्यामुळे भंडारी कुटुंबीय सकाळी ९.४५ वाजता घरी आले.
असा मुद्देमाल लंपास
घरात पाहिले असता साहित्याची नासधूस झालेली होती. कपाटात ठेवलेले १ लाख ३९ हजार ५०० रुपयांची रोकड १३ हजार रुपये किंमतीची ११ ग्रॅम सोन्याची मंगलपोत, ७ हजार २०० रुपये किंमतीचे ८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या. १५ हजार रुपये किंमतीच्या लहान मोठ्या सोन्याच्या अंगठ्या आणि ८ हजार रुपये किंमतीचा डायमंड नेकलेस असा एकूण १ लाख ८२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याचे उघड झाले. तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी करीत आहे.