बचतगटांमुळे महिलांमध्ये आर्थिक साक्षरता, आत्मविश्वास वाढला
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२१ । बचतगटाच्या माध्यमातून देशात एक मोठी चळवळ उभी राहिली असून माहिलांमध्ये आर्थिक साक्षरता वाढीस लागली आहे. आत्मविश्वास निर्माण करण्याचे ते एक मोठे व्यासपीठ बनले आहे. यामुळेच देशातील १४ कोटी कुटूंबे मुख्य प्रवाहात आली आहे. बचतगटांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड नियमित असल्याने बँकांचे कर्ज देण्याचेही प्रमाण वाढले आहेत असे, प्रतिपादन नाबार्डचे एजीएम श्रीकांत झांबरे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय कृषी ग्रामिण विकास बँक नाबार्ड जळगावच्या वतीने कुसूंबा ता. जळगाव येथे महिला बचतगटांचे सदस्य व पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी व्यासपीठावर नाबार्डचे एजीएम श्रीकांत झांबरे, लिड बँकेचे अरूण प्रकाश, डॉ. अर्पणा मकासरे, अनिता वाघ, अॅड. अंजली कुलकर्णी उपस्थित होते.
महिला बचतगट हे केवळ कर्ज घेणे वा देणे या पुरते मर्यादीत न राहाता ते विधायक उपक्रमांचे मोठे व्यासपीठ बनले आहे. आरोग्य, शिक्षण, उपजीविका, उद्योग आदींचेही वैचारिक शिक्षण आपोआप या माध्यमातून होत असल्याचे झांबरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. या वेळी डॉ. मकासरे यांनी महिलांचे आरोग्य, आहार, विचार यावर तर अनिता वाघ यांनी बचत गटांची बांधणी, व्यवसाय याबाबत माहिती दिली. या वेळी जळगाव येथील झांशीची राणी महिला बचत गटांनी सुरू केलेल्या बायोडिग्रेबल सॅनिटरी पॅडची माहिती अर्चना महाजन व रुद्राणी देवरे यांनी दिली. कार्यक्रमास नेहरू युवा मंडळ या संस्थेचे सहयोग लाभला.
सूत्रसंचालन व प्रास्ताविक नितीन नेरकर यांनी केले. यशस्वीतेसाठी कुसूंबा येथील महिला बचतगटाच्या सीआरपी मनिषा कोळी, सुनिता बाविस्कर, सोनाली पाटील, उषा साळुंके, सरला पाटील, ज्योती पाटील यांचे सहकार्य लाभले.