जळगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ ; एकाच दिवसात घेतला ८ जणांना चावा
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२१ । गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. काल दिवसभरात आठ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यात सहा जण हे जळगाव शहरातील असून एक धरणगाव येथील तर एक ११ वर्षीय मुलगी भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील आहे. या सर्व रुग्णांवर जीएमसीत प्राथमिक उपचार करण्यात आले असून गंभीर रुग्णांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात व रुग्णालयात रेफर करण्यात आले.
जळगाव शहरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असतानाही प्रशासनही कोणतीही अंमलबजावणी करताना दिसत नाही. भटक्या कुत्र्यांचा वावर संपूर्ण शहरात वाढला आहे. शहरात भटकी कुत्री गल्लोगल्ली बघायला मिळतात. नागरिकांनी फेकलेल्या अन्नपदार्थांवर आपली भूक भागवून ही कुत्री इकडे तिकडे फिरत असतात.
मात्र या भटक्या कुत्र्यांवर प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. ही कुत्री विशेषत: लहान मुलांना लक्ष्य करतात आणि चावा घेतात. काल एकाच दिवसात आठ जणांना या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. दरम्यान प्रशासनाने कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता, लवकरात लवकर खबरदारीचे पाऊल उचलावे अशी मागणी नागरिक करत आहेत.